Exit Poll 2019 : मावळमध्ये रेकॉर्डब्रेक ! शिवसेनेचे श्रीरंग बारणे ‘विक्रम’ नोंदविणार !

ठिकठिकाणच्या बातमीदारांकडून – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असल्याने मावळ लोकसभा निवडणुकीकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीकडून पार्थ पवार तर शिवसेनेकडून श्रीरंग बारणे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. एकदम हायप्रोफाईल मतदार संघ म्हणून मावळ लोकसभा मतदार संघाकडे पाहिले गेले. दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांकडून सोशल मिडीयावर चिखलफेक देखील झाली. मतदानाच्या अगोदारच्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी पैसे वाटण्याचा देखील प्रकार घडला. एकंदरीत मतदान शांततेत झाले आणि चर्चा सुरू झाल्या त्या कोण निवडुन येणार या गोष्टीची. मावळ लोकसभा मतदार संघात आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्डब्रेक होतील आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे विक्रमी मतांनी निवडुन येतील असे ठिकठिकाणच्या बातमीदारांनी कळविले आहे. दि. २३ मे रोजी श्रीरंग बारणे विक्रम नोंदविणार हे निश्‍चित आहे मात्र उत्कंठा आहे ती केवळ आकडयाचीच.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातुन लोकसभा निवडणुक लढविणार असल्याचे सुरवातीला जाहिर केले. त्यानंतर अचानकपणे काही कारणामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. दरम्यान, सुरवातीला शरद पवार यांनी पार्थ पवार हे लोकसभा निवडणुक लढवणार नाही असे कॅमेर्‍यासमोर सांगितले. पार्थ पवार यांच्यामुळे शरद पवार यांनी माढयातुन माघार घेतल्यानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली. अखेर मावळ लोकसभा मतदार संघातुन पार्थ पवार यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्याने शिवसेेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे अधिक जोमाने प्रचाराला लागले. कारण उमेदवार जरी पार्थ पवार असले तरी त्यांच्या पाठीमागे अजित पवार आणि संपुर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्‍कमपणे उभा होता. अनुभवी असलेल्या श्रीरंग बारणे यांनी गावो-गावी आणि घरोघरी जावुन प्रचार केला. बारणे यांना भाजपच्या आमदारांची आणि पदाधिकार्‍यांची तसेच कार्यकर्त्यांची चांगलीच मदत झाली. आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील त्यांना चांगलीच साथ मिळाली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांना शेकापची चांगलीच साथ मिळाली.

पार्थ पवार यांनी जोरदार प्रचार देखील केला. मात्र, तो प्रचार श्रीरंग बारणे यांच्यासमोर फिक्‍का पडला. पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांच्या समर्थकांनी सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या. त्याप्रकरणी संबंधितांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले. संबंधितांवर अटकेची देखील कारवाई करण्यात आली.

संपुर्ण मतदार संघातील वातावरण ढवळुन निघाले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संपुर्ण मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कामाला लावले. त्यांनी स्वतः जातीने लक्ष घातले. शिवसेनेकडून देखील पनवेल, कर्जत आणि उरण विधानसभा मतदार संघात अधिक जोर लावण्यात आला. मावळ, चिंचवड आणि पिंपरी मतदार संघातुन बारणे यांना मोठे मताधिक्य मिळेल आणि त्यावरच ते विक्रम नोंदवतील असे ठिकठिकाणच्या बातमीदारांनी कळविले आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदानाच्या दिवशी अक्षरशः संपुर्ण मतदार संघात पैशाचा पाऊसच पडला. पैसे वाटणार्‍यांविरूध्द ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले. मात्र, मतदान शांततेत पार पडले. मतदान झाल्यानंतर सर्वत्र चर्चा होवु लागली ती श्रीरंग बारणे विक्रमी मतांनी निवडुन येणार याचीच. दि. 23 मे रोजी शिवसेनेचे श्रीरंग बारणे नेमकं किती मतांनी निवडुन येणार हे स्पष्ट होणार आहे.