Pune : धक्कादायक ! खराडी आयटी पार्कमधील 32 वर्षीय महिलेला कॅब चालकाकडून गुंगीचे औषध, अश्लील फोटो काढून अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  खराडी आयटी पार्कमध्ये नोकरी करणाऱ्या एका 32 वर्षीय महिलेला कॅब चालकाने गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने महिलेचे अश्लील फोटो काढून तिला संबंध ठेवण्यास धमकावत होता.

याप्रकरणी कॅब चालक प्रमोद कनोजिया याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 32 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या नोकरी निमित्त पुण्यात आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांना पुण्यातील खराडी आयटी पार्क येथे नोकरी मिळाली होती. त्यामुळे त्या भाड्याने विमाननगर भागात राहुन नोकरी करत. त्यांचे काही मित्र-मैत्रिणी पुण्यात राहतात. यामुळे त्यांचा एकत्र भेटण्याचा प्लॅन झाला होता. मुंढवा येथील एका मित्राच्या घरी ते भेटणार होते. दरम्यान त्यांना मित्राकडे जायचे असल्याने त्यांनी कॅब बुक केली. ती कॅब आरोपीची होती. त्याने फिर्यादी यांना मित्राच्या घरी सोडले. यानंतर तो गेला. पण, नंतर त्याने फिर्यादी यांना व्हाट्सअ‍ॅपला मेसेज केला. तसेच मॅडम, मला भाडे कमी असते, तुम्हाला कॅब लागली तर मला सांगा अशी विनंती केली. त्यामुळे फिर्यादी यांनी परत घरी जाण्यास त्यालाच बोलावले. तो पुन्हा कॅब घेऊन आला व फिर्यादी यांना सोडण्यास निघाला. पण त्याने फिर्यादी या कॅबमध्ये बसल्यानंतर त्यांना पाणी पिण्यास दिले. यावेळी त्यांना काही क्षणातच गुंगी आली. त्यानंतर त्यांना काहीच आठवले नाही. त्यांना जाग आली असता त्या एका लॉजवर असल्याचे लक्षात आले. त्यावेळी आरोपी देखील तेथेच होता. त्यानंतर त्याने माझ्याकडे अश्लील फोटो असून, मला पाहिजे ते दे म्हणत अत्याचार केले. त्यानंतर फिर्यादी यांनी जाऊ देण्यासाठी विनंती केल्याने त्याने फिर्यादी यांना घरी आणून सोडले. पण नंतर तो सतत फिर्यादी यांच्या संपर्कात राहू लागला. त्याने फिर्यादी यांना फोटो व्हायरल करण्याची धमकी देत भेटण्यास बोलवत असे. तर त्याने फिर्यादी यांच्या पतीला व मैत्रिणीला देखील मॅसेज केले. यानंतर फिर्यादी यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गाडेकर हे करत आहेत.