Pune : धक्कादायक ! वडगाव परिसरात आई – वडिलांनीच 13 दिवसाच्या मुलाला पुरून ठेवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील वडगाव परिसरात एका 13 दिवसाच्या लहान मुलाला आई-वडिलांनी पुरल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. बाळ पूर्ण अपंग असल्याने आणि ते नंतर नीट होणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितल्याने त्याला मारून पुरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे धाव घेतली आहे.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलीसांनी कुवरसिंग सुभाष ठाकूर (वय 34, रा. तुकाईनगर, हिंगणे खुर्द) व आई सिद्धी ठाकूर (वय 21) यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव येथील सिंहगड कॉलेजच्या पाठीमागे गोदावरी हॉस्टेल आहे. या भागात जंगल आहे. दरम्यान हे बाळ अपंग जन्माला आले होते. त्यांनी डॉक्टरांना दाखवले. यावेळी डॉक्टरने ते उपचार केल्यानंतर देखील बरे होणार नसल्याचे सांगितले. यामुळे आईने या मुलाचा जीव घेतला. यानंतर वडिल व आईने त्याला सोमवारी रात्री येथील जंगलात खड्डा खानुन पुरले.

हा सर्व प्रकार मंगळवारी सायंकाळी सिंहगड रोड पोलिसांना समजला. यानंतर मध्यरात्री सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच खातरजमा करून याची माहिती घेतली. यानंतर रात्रभर येथे बंदोबस्त ठेवला. सकाळी याची माहिती तहसील कार्यालयाला दिली.

दरम्यान खड्डा उकरण्यासाठी तहसीलदार यांची परवाणगी लागते. यामुळे पोलीस आता तहसीलदार यांच्याकडे रितसर परवानगीसाठी गेले आहेत. तहसीलचे अधिकारी आल्यानंतर खड्डा खाणण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. घटनास्थळी गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ माजली आहे. परीसरात ही माहिती वाऱ्या सारखी पसरली आहे. नागरिकांनी येथे तोबा गर्दी करण्यास सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले.

गल्लीत बाळ दिसले नाही अन…
कुवरसिंग ठाकूर याला 2 ऑक्टोबरला मुलगा झाला होता. याची माहिती गल्लीत व परिसरात सर्वत्र माहिती होते. पण, बाळ दोन दिवसांपासून दिसत नव्हते. ही कुन-कुन कर्मचाऱ्यांना लागली आणि या घटनेचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांचे स्थानिक नेटवर्कवरून दिसत असून, बेसिक पोलिसिंग किती महत्व आहे, हे दिसून येते.