Pune : धक्कादायक ! खासगी कंपनीने लपवली माहिती, कोरोनाबाधित 32 कामगारांना ठेवले पत्र्याच्या गोदामात, वेळीच प्रकार समोर आल्याने अनर्थ टळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. औद्योगिक क्षेत्रातील प्रत्येक कंपन्यांना आपल्या कामगारांची चाचणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, खेड तालुक्यातील मरकळ येथील एका खासगी कंपनीने 32 कामगारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे लपवून ठेवले. एवढेच नाही तर या कामगारांना एका पत्र्याच्या गोदामात ठेवले. हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

खासगी कंपनीत काम करणाऱ्या 32 कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र, कामगारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती संबंधित कामगार ठेकेदाराने लपवून ठेवली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याऐवजी पत्र्याच्या गोदामात ठेवले. हा धक्कादायक प्रकार खेड पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने उघडकीस आणला आहे. या कामगारांना तातडीने कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. अशा घटनांमुळे औद्योगिक वसाहतीमधील कंपनी व्यवस्थापन आणि ठेकेदार यांच्या निश्काळजीपणावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

यापार्श्वभूमीवर खेड पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने संबंधित कंपनीला नोटीस बजावली आहे. तर 32 कामगारांना महाळुंगे येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार प्रशासनाच्या वेळीच लक्षात आल्याने आणि दखल घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे. कामगारांना वेळीच उपचार मिळाल्याने त्यांच्या आरोग्याचा धोका टळला आहे.

मरकळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही गंभीर बाब असल्याने स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, सभापती भगवान पोखरकर, माजी सभापती अंकुश राक्षे, पंचायत समिती सदस्य अरुण चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी आढावा घेतला. त्यावेळी कोरोना बाधित 32 कामगारांना पत्र्याच्या गोदामात ठेवल्याचे उघडकीस आले.