Pune : धक्कादायक ! पोलिस ठाण्याच्या तपास पथकाच्या खोलीतून बलात्काराच्या गुन्हयातील आरोपीचे पलायन, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरातील एका पोलीस ठाण्याच्या तपास पथकाच्या खोलीतून बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पसार झाला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अलंकार पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला आहे.

अजय गणेश चव्हाण (वय १९, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे पसार झालेल्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस कर्मचारी सचिन मनोहर बुधावले यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी अजय चव्हाण याच्यावर अलंकार पोलिस ठाण्यात काही दिवसापूर्वी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याला अलंकार पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली होती. त्याला गुरुवारी रात्री कर्मचारी यांच्या ताब्यात दिला होता. त्याला तपास पथकाच्या खोलीत बेडी घालून ठेवले होते. त्यावेळी बुधावले हे कर्तव्यावर होते. त्यांना पहाटेच्या सुमारास डोळा लागल्याचे पाहून आरोपीने पलायन केले. काही वेळानंतर हा प्रकार समोर आला. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपीने पोलीस ठाण्यातून पलायन केल्याने चांगलीच धावपळ उडाली होती. तपास पथक आणि झोन तीनचे अधिकारी त्याचा शोध घेत होते. दिवसभर त्याचा शोध घेत असताना रात्री त्याला वारजे माळवाडी भागातून पकडण्यात आले असल्याचे तपास अधिकारी सहायक निरीक्षक अरुण घोडके यांनी सांगितले.