Lockdown 5.0 : रूग्ण आढळलेलीच दुकाने-घर सील करावीत, परिसर सील करू नये : व्यापारी महासंघ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुण्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरातील दुकाने 17 मार्चपासून बंद करण्यात आली आहेत. ही दुकाने पुन्हा सुरु करण्याची परवानगी द्यावी यासाठी पुणे व्यापारी महासंघाच्या शिष्ठमंडळाने आज (सोमवार) पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये इलेक्ट्रिक, भांडी, टिंम्बर, प्लायवुड, आयर्न स्टील, कापड, सोने-चांदी, मशीनरी, अगरबत्ती, जनरल, जुने वाहन विक्री इत्यादीच्या घाऊक बाजारपेठ आहे. या ठिकाणाहून शहरातच नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात माल पाठवला जातो. सध्या ही दुकाने बंद असल्यामुळे पुरवठा साखळी खंडित झाली असून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे हे व्यवसाय पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण सापडतील तेवढीच इमारत, घर सील करावे, संपूर्ण परिसर सील करू नये. तसेच त्या भागातील व्यवसायिकांना दुकाने उघडून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष फतेहचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया, उपाध्यक्ष रतन किराड, हेमंत शहा, नितीन काकडे, अमृत सोळंकी, मोहन पटेल, भारत शाह, निलेश फेरवानी, बोगावत, शिवलाल पटेल, रवी जेठवानी, शंकर पटेल, ऋषी खंडेलवाल आदी प्रतिनिधी उपस्थित होते .