Pune : हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या रस्त्यावरील दुकाने खुली; नियमांची ‘ऐशीतैशी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा ज्वर कमी होत नाही, त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा कडक निर्बंध जारी केले. औषधालये आणि हॉस्पिटल 24 बाय 7 तर, किराणा दूध, चिकन, मटण, मासे विक्रीसाठी सकाळी 7 ते 11 पर्यंत वेळ दिली आहे. मात्र, हडपसर बाजार पेठेतील क्षेत्रीय कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अत्यावश्यक सेवेशिवाय असणारी सर्रास दुकाने खुली असल्याचे दिसून आले. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी याच रस्त्याने ये-जा करतात.

तरी त्यांना ही दुकाने उघडी असल्याचे का दिसले नाही, असा संतप्त सवाल सामान्य नागरिकांनी उपस्थित केला. रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळत नाही, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही, अतिदक्षता विभागात जागा शिल्लक नाही, व्हेंटिलेटर बेड मिळत नाही, अशी भयावह परिस्थिती आहे, म्हणून राज्य सरकार कठोर निर्णय जाहीर करीत आहे. मात्र, महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून त्याची अंमलबाजवणी का केली जात नाही, अशी विचारणा आम जनता करीत आहे.

दुकाने बंद करा, शासनाचे नियम पाळा, असे सांगत पोलिसांची व्हॅन आणि दुचाकी रस्त्याने धावत आहे. पोलिसांचा आवाज आला की शटर खाली आणि व्हॅन-पोलीस गेले की दुकाने उघडी असाच काहीसा प्रकार हडपसरमधील काही ठिकाणी दिसून आला. त्यामुळे लॉकडाऊन आहे की नाही, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारीही नागरिकांचीच आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाची वाहने सोलापूर रस्त्यावरील उड्डाण पुलाखाली सावलीत उभी होती. अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे वेळापत्रक बनवणे आवश्यक आहे. सकाळी सहा ते साडेनऊपर्यंत भाजीविक्रेते हडपसर गाडीतळ ते जनसेवा बँकेपर्यंत रस्त्यावर भाजीविक्री करतात. मात्र अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचारी दहा वाजता येतात, तोपर्यंत ही मंडळी निघून गेलेली असता. काही ठराविक व्यावसायिक असतात, त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही, अशी तक्रार येथील नागरिकांनी केली.