Pune : कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा ! केंद्र शासनाकडून पुणे जिल्ह्यासाठी दोन दिवसांत 3 लाख 73 हजार डोसेज उपलब्ध करून दिले जाणार – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे पुण्यातील अनेक केंद्रांवरील लसीकरण प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. केंद्र शासनाने याची दखल घेत थेट पुणे जिल्ह्याला आज रात्री २ लाख ४८ हजार तसेच दोन दिवसांत आणखी सव्वा लाख डोसेज उपलब्ध करून दिले आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रयत्नांतून पुणे जिल्ह्याला हे डोसेज उपलब्ध झाले असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने उपस्थित होते. मोेहोळ म्हणाले, की पुणे शहरात वेगाने कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. लसींच्या तुटवड्यामुळे मागील दोन दिवसांपासून लसीकरण प्रकियेत अडथळे आले. आजही काही लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली, ही वस्तुस्थिती आहे. लसीकरणासाठी लस उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत होता. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशीही पत्र व्यवहार करण्यात आला होता. त्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आज रात्री पुणे जिल्ह्यासाठी आज रात्री २ लाख ४८ हजार डोस तसेच येत्या दोन दिवसांत सव्वालाख डोसेज देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यानुसार आज रात्री लस मिळणार आहेत. यापैकी प्रत्येकी ४० टक्के लस पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी तसेच २० टक्के लस या पिंपरी चिंचवडसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

लस पुरवठ्यात राजकारण !
लशींच्या तुटवड्यामुळे पुणे शहरासह नवी मुंबई, सातारा आणि विदर्भातील काही शहरातील लसीकरण मागील दोन दिवसांपासून थंडावले असून काही ठिकाणी बंदही ठेवण्यात आले आहे. लशींच्या पुरवठ्यावरून केेंद्रीय आरोग्य मंत्री आणि राज्य शासनामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. अशातच केंद्र शासनाने पुणे जिल्ह्यातील दोन प्रमुख महापालिकांमध्ये ज्याठिकाणी भाजपची सत्ता आहे, त्याच शहराला थेट लसींचा साठा उपलब्ध करून दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लसींच्या पुरवठ्यामध्ये राजकारण होत असल्याला पुष्टी मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.