Pune : पुण्यात ‘कोरोना’ प्रतिबंधक लसींचा तुटवडा ! केवळ 7000 डोसेस उपलब्ध, जाणून घ्या मनपा आयुक्त विक्रम कुमार काय म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  येत्या १ एप्रिलपासून ४५ वर्षे वयावरील नागरिकांनाही लस द्यावी लागणार असून मोठ्याप्रमाणावर नोंदणी होण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने मागील काही दिवसांपासून लसीकरणाचा वेग काहीसा मंदावल्याने महापालिकेपुढे भलताच पेच निर्माण झाला असून लसीकरणाबाबत साशंकताही व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे शहरात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. १ मार्चपासून ६० वर्ष वयावरील व ४५ वर्षे वयावरील व्याधीग्रस्तांचे लसीकरण सुरू झाले. तर येत्या १ एप्रिलपासून ४५ वर्षे वयावरील सर्वाना लस देण्यात येणार आहे. सध्या शहरात १०९ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. यामध्ये शासकिय व महापालिकेच्या रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. मधल्या टप्प्यात प्रत्येक केंद्रावर उद्दीष्टापेक्षा दीड ते दोनपट लसीकरण झाले. दररोजच्या लसीकरणाची संख्या १८ हजारांपर्यंत पोहोचली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून अनेक केंद्रांवरून नागरिकांना माघारी फिरावे लागत आहे. खाजगी रुग्णालयांमधूनही टोकन घेतल्यानंतरही लस मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

यापार्श्‍वभूमीवर महापालिकेतील अधिकार्‍यांकडे आढावा घेतला असता, सध्या महापालिकेकडे केवळ ७ हजार डोसेस शिल्लक आहेत. प्रत्येक केंद्रांला दररोज १०० डोसेेस द्यायचे झाले तरी दररोज ११ हजार डोसेसची गरज आहे. मात्र, लसीकरणात खंड पडू नये, यासाठी उद्दीष्टापेक्षा कमी डोसेेस दिले जात आहेत. डोसेसच नसल्याने आजच्या दिवशी अशी परिस्थिती दिसत असताना १ एप्रिलला काय परिस्थिती राहील, याची चिंताही अधिकारी व्यक्त करत आहेत. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केंद्रांने राज्याला मोठ्याप्रमाणात लस उपलब्ध करून द्यावी, तसेच २५ वर्षावरील सर्वांना लस देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. जावडेकर यांनीही तातडीने लसीचा साठा उपलब्ध करून देण्यात येईल आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनाचे काय झाले? असा प्रश्‍न आता उपस्थित होउ लागला आहे.

केंद्र शासनाकडे डोसेसची मागणी करण्यात आली आहे. उद्या अर्थात ३१ मार्चला डोसेस उपलब्ध होतील, असे केंद्राने कळविले आहे. तसेच १ एप्रिल पासून लसीकरणाची संख्या वाढविण्यासाठी ८ शासकिय आणि २२३ खाजगी रुग्णालयांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या केंद्रांनाही एक-दोन दिवसांत परवानगी मिळेल. त्यानंतर लसीकरण केंद्रांची संख्या ३४० होईल. मोठ्याप्रमाणावर लसींचे डोस उपलब्ध झाल्यास दररोज ५० हजार लसीकरणाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

– विक्रम कुमार, पुणे महापालिका आयुक्त