Pune : सिमला ऑफिसच्या सुरक्षा रक्षकांना करवतीचा धाक दाखवत चंदनाच्या झाडांची चोरी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात चंदनचोरांचा उच्छाद सुरूच असून, भारतीय हवामान विभागाच्या (सिमला ऑफिस) सुरक्षा रक्षकांना करवतीचा धाक दाखवत चंदनाची दोन झाडे चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. याघटनेमुळे मात्र खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गणेश आडागळे (वय 52, रा. कसबा पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजीनगर येथील भारतीय हवामान विभागाच्या ऑफिसमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीस आहेत. हवामान विभागाचे हे ऑफिस मोठे असून, त्याठिकाणी झाडी देखील आहे. दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री फिर्यादी व त्यांचे इतर सहकारी गेटवर ड्युटीला होते. यावेळी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास चौघेजण परिसरात शिरले.

फिर्यादी व सहकार्यांनी पाहिले असता चोरट्यांनी त्यांनाच धमकावत करवतीचा धाक दाखवला आणि गप्प बसण्यास सांगितले. तसेच येथे असलेले चंदनाची दोन झाडे कापून चोरून नेली. जवळपास एक तास हा सर्व थरार सुरू होता. चोरटे चंदनाची झाडे घेऊन गेल्यानंतर या सुरक्षा रक्षकांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर याबाबत पोलिसांना सांगण्यात आले. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही पडताळणी करून चोरट्यांचा माग काढत आहेत. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.