Pune : …म्हणून ‘लिव्ह इन’मध्ये राहणार्‍या मुलीचा सागरनं केला खून, पोलिसांकडून तरूणाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुलीचा चारित्र्याच्या संशयावरून खून करणा-या तरुणाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सागर वानखडे (वय २८) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सागर याने त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचा गुरुवारी (ता. २२) दुपारी दोनच्या सुमारास पेरणे फाटा परिसरात वायरने गळा आवळून खून केला होता.

सागर हा संबंधित मुलीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. घटनेच्या दिवशी याच कारणावरून त्यांच्यात वाद झाले. त्यामुळे त्याने रागाच्याभरात त्याने तिचा वायरने गळा आवळून तिचा खून केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सागर याला न्यायालयात हजर केले असता, हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. यातील मयत मुलगी ही अल्पवयीन असून त्याने तिला पळवून आणले आहे का?, त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का?, हा गुन्हा त्याने नेमका कोणत्या कारणासाठी केला?, यासह गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली.