Pune : …म्हणून ब्युटी पार्लरवाल्या ‘त्या’ सुप्रिया अन् तिच्या साथीदारांनी केलं होतं नर्सिंग होममधील कर्मचार्‍याचं 30 लाखाच्या खंडणीसाठी अपहरण; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   त्या नर्सिंग होममधील कर्मचाऱ्याचे अपहरणात खळबळ जनक माहिती समोर आली असून, कोरोनात रुग्णालये खूप पैसे कमावत असल्याच्या अंदाज्याने त्या डुप्लिकेट क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी त्याचे अपहरण करत 30 लाख रुपयांची खंडणी मागितली असल्याचे समोर आले आहे. बिबवेवाडी पोलिसांनी 24 तासात हे प्रकरण उघड करत चौघांना अटक केली आहे. बोपदेव घाटात नेहून अपहरण झालेल्या तरुणाला बेदम मारहाण केली होती.

अमोल अनिल गायकवाड उर्फ (सीडी सोन्या) (रा. बिबवेवाडी), किरण प्रकाश साळुंखे (वय 27), मिथुन नंदलाल चव्हाण (वय 29, रा. माळशिरस ,जि. सोलापूर) आणि महिला साथीदार सुप्रिया बाबुराव घाडगे (वय 30) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. तर दोघे पसार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पुणे सातारा रस्त्यावरील राव नर्सिंग होममध्ये अकाउंटंट म्हणून अपहरण झालेला तरुण नोकरी करतो. गेल्या महिन्यात (दि. 5 मार्च) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एक महिला व दोघेजण रुग्णालयात आले होते. तरुणाला आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस असून, तुझ्याकडे चौकशी करायची असल्याचे सांगत त्याला बाहेर नेले. तर बाहेर आणखी दोघेजण रिक्षात बसले होते. या पाच जणांंनी रिक्षातून त्याचे अपहरण करत त्याला मारहाण केली. तर तू, हॉस्पिटलमध्ये पैश्यांचा अपहार करतो, आता तुझ्यावर कारवाई करून तुला जेलला पाठवतो, असे म्हणत त्याचे दुचाकीवरून बोपदेव घाटात नेले. एका हॉटेलमध्ये नेहून त्याला 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच पैसे नाही दिले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. भीतीने त्या तरुणाने पैसे देतो, असे सांगितले. यानंतर त्याला कोंढवा येथील एका एटीएम केंद्रात आणले. त्याच्या खात्यावरून 78 हजार 500 रुपये काढले. त्यानंतर त्याला एका रिक्षात बसवून घरी पाठवले. कोणाला काही सांगितले तुझा खून करू अशी धमकी दिली होती यानंतर त्याला सतत फोन करून बाकीचे पैसे दे अन्यथा तुला ठार मारू अश्या धमक्या देत होते. यामुळे पोलिसांकडे तक्रार दिली होती. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुुरु केला होता.

सहाय्यक निरीक्षक राजेश उसगावकर व त्यांचे पथक करत होते. त्यावेळी सीसीटीव्हीची पडताळणी व खबरी यांच्या मार्फत माहिती काढत असताना अमोल गायकवाड याच्याबाबत माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने इतर आरोपींची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अकलूज व सांगोला येथून इतर तिघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी साथीदारांच्या मदतीने गुन्हा केला असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांना अटक केली आहे.

सुप्रिया घाडगे हीचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. तर चव्हाण व साळूखे हे चुलत भाऊ आहेत. ते रहाण्यास बिबवेवाडी परिसरात होते. त्यांची ओळख अमोल याच्यासोबत झाली होती. तर अमोल याची सुप्रिया ही ओळखीची आहे. सध्या कोरोना काळात रुग्णालयात खूप गर्दी असते. त्यामुळे ते पैसे कमवतात, असा हेरा या आरोपींचा होता. मग त्यांनी आधी पाहणी केली. एकजण रुग्णालयात जाऊन आला. त्याने विचारपूस केली. येथे अकाऊंटंट कोण आहे, हे पाहिले. अपहरण झालेल्या तरुणाशी बोलले. त्याच्याकडे आयफोन आणि गाडी पाहिली, मग त्यांनी त्याचे अपहरण करण्याचे ठवरले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, सहाय्यक निरीक्षक राजेश उसगावकर, श्याम लोहोमकर व त्यांच्या पथकाने केली आहे.