स्वयंघोषित कार्यकर्त्यांच्या नजरांना द्यावं लागतं तोंड, ‘कोरोना’च्या भीतीमुळे घर बदलणाऱ्यांची वाढतेय डोकेदुखी

पुणे : करोना विषाणूचा वाढता संसर्ग, समाज माध्यमातून पसरणाऱ्या अफवा, दिवसागणिक प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये होत आहे. त्यामुळे कोरोनाविषयी नागरिकांच्या मनामध्ये धडधड वाढत आहे. करोना विषाणूचा वाढता फैलाव, लॉकडाऊनची परिस्थिती पाहता घरमालकांना विशेष सूचना करत भाडेकरूंना अभय देण्यात आले आहे. परंतु, काही कारणास्तव स्थलांतर करणाऱ्या भाडेकरूंना त्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या संशयी नजरांना तोंड द्यावे लागत आहे. तर काही ठिकाणी विरोध सहन करावा लागत आहे. दुसरीकडे काही उत्साही नागरीक पोलिसांपर्यंत माहिती देण्याच्या नादात त्यांची डोकेदुखी वाढवित आहेत.

जगभर कोरोनाचे थैमान सुरू आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी शासन आणि प्रसासन कोरोना व्हायरसवर उपचार करण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत आहे. मात्र, दुसरीकडे काही हौशी मंडळी मात्र दुसऱ्याच्या दुःखात समाधान मानण्यात धन्यता मानत आहे. आज प्रत्येकजण कमाविण्यासाठी नाही, तर जगण्यासाठी धडपडत आहे. अघोरी आनंद मिळविणाऱ्यांवर पोलीस यंत्रणेने वेळीच कारवाई करणे गरजेचे आहे, असे हडपसरमधील सूज्ञ नागरिकांनी सांगितले.

करोनाचा प्रादुर्भाव हडपसर आणि परिसरातही होऊ लागला आहे. उपनगरालगतच्या गावांमध्येही करोनाची एंट्री होऊ पाहात आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चौथ्यांदा लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे श्रमजीवींसह अन्य नोकरदारांसह व्यावसायिकांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत हातातील काम सुटल्याने काही मंडळी भाडे परवडत नाही, कामाचे ठिकाण दूर आहे. तरीसुद्धा स्थानिकांच्या करोनाविषयक अतिसावध पवित्र्यामुळे शहर परिसरातच स्थलांतर करत आहेत. स्थलांतर करणारे असे भाडेकरू हे करोनाग्रस्त भागातूनच आले असावेत, असा गैरसमज काही मंडळी पसरवत आहेत, ही बाब समाजहिताला घातक आहे. परिसरातील रिकाम्या खोलीत रात्रीतून सामान येऊन पडला की भल्या सकाळीच त्या वसाहतीतील लोक एकत्र येतात. नवख्या भाडेकरूवर चौकशीचा भडिमार करत त्याला तेथे राहण्यास ठाम विरोध दर्शवित आहेत.

वास्तविक स्थलांतर करणारे भाडेकरू किंवा मंडळी वैद्यकीय तपासणी करून आलेले असतात किंवा वैद्यकीय तपासणीसाठी तयार असतात. परंतु, करोना संसर्गाच्या भीतीमुळे त्यांना स्थानिकांच्या विरोधास तोंड द्यावे लागते. काही मंडळी थेट लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांना हाताशी धरत पोलीस ठाणे गाठत सुशिक्षित नागरीक असल्याचा आव आणत आहेत. परिणामी पोलिसांच्या कामात अडथळे येत आहेत. वास्तविक, करोनाचा वाढता संसर्ग पाहता कोणीही आपले राहाते घर सोडू नये, अशी सूचना पोलिसांकडून सातत्याने होत आहे. वैद्यकीय तपासणी केली असली, तरी आणि करोनाचा अहवाल नकारात्मक असला तरीसुद्धा त्यांनी घर बदलल्यानंतर स्वतःला अलगीकरण करून घ्यावे, नागरिकांनीही संयम राखत सहकार्य करावे, असे आवाहन हडपसर पोलिसांनी केले आहे.