पीएमपी प्रवाशांची सेवा करून आदर्श निर्माण केला : करडिले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागिल दोन महिन्यापासून कोरोना व्हायरसमुळे माणूसपण हरवले की काय असे वाटू लागले आहे. चालक-वाहक आणि अधिकारी म्हणून पीएमपीमध्ये काम करताना चांगले-वाईट अनुभव येतात. प्रवाशांना चांगली सेवा देऊन एक आदर्श निर्माण केला आहे, हीच मोठी समाजसेवा आहे. सेवापूर्तीनंतरही कुटुंबाला वेळ देत समाजसेवा करीत राहा, असे हडपसर पीएमपी आगारप्रमुख नारायण करडिले यांनी सांगितले.

भेकराईनगर पीएमपीमध्ये प्रदीर्घ सेवा केलेल्या रमेश तुपे, अर्जुन भोसले, आनंदराव जेधे, बंडू दिवेकर, वसंत भापकर, अनिल ताकवले, शिवाजी काळे, काशिनाथ मोरे, वसंत कांबळे, निवृत्ती भुजबळ, विलास पवार, बाळासाहेब राऊत, बाळू करडे, अनिल साळुंके, प्रवीण कवठेकर यांचा सेवापूर्तीनिमित्त शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले.

सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन सुनील बालगुडे, विवेक हरजित, प्रमोद जेधे, महेश हेंद्रे, सिद्धेश्वर कवडगावे, दत्तात्रय थोरात, परमेश्वर ठाकरे, अभिमन्यू खंदारे, वैभव येळे, विनायक क्षीरसागर, निवृत्ती माळशिकारे, राजू भोसले, संजय पवार यांनी केले होते.

हडपसर पीएमपी आगारप्रमुख सोमनाथ वाघुले म्हणाले की, पीएमपीमध्ये नोकरी करीत असताना मोठा अनुभव गाठीशी आले. बसमध्ये जनतेची सेवा केली, ही तुमच्यासाठी जमेची बाजू आहे. ज्या गोष्टी नाहीत, त्याकडे लक्ष देण्यापेक्षा आहे त्यामध्ये समाधान माना आणि जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घ्यायला शिकले पाहिजे, असा मार्गदर्शनपर सल्ला त्यांनी दिला.

सिरष्णे (ता. बारामती) माजी सरपंच किसन जाधव म्हणाले की, सेवापूर्ती केल्यानंतर आलेल्या पैशांचा योग्य नियोजन करा. देवदर्शन, पर्यटन आणि पै पाहुण्यांच्या गाठीभेटी घ्या, सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याचा आनंदाने उपभोग घ्या, असे त्यांनी सांगितले.

उद्धव भोसले यांनी सूत्रसंचालन केले, संजय कदम यांनी आभार मानले.