अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडावर मांज्यामध्ये अडकलेल्या कावळ्याची केली सुटका

पुणे : हडपसर (लक्ष्मी कॉलनी, 15 नंबर) येथे अग्निशमन दलाचे वाहन घेऊन कर्मचारी आणि फायरमन चंद्रकांत नवले आणि सोमनाथ मोटे आले. त्यांनी तातडीने झाडावर चढून फांदीवरील मांज्यामध्ये अडकलेल्या कावळ्याची सुटका केली. कावळ्याने सुटका होताच हवेत भरारी घेतली. इतरही कावळ्यांचा गलका थांबला. हडपसर अग्निशमन दलाचे अधिकारी शिवाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केल्याचे नवले यांनी सांगितले.

भल्या पहाटे झाडाच्या फांदीवर पतंगाचा तुटलेल्या मांजामध्ये कावळा अडकला. कावळ्याची सुटका करण्यासाठी धडपड सुरू होती, मात्र काही केल्या त्याला त्यातून बाहेर येता येईना. कावळ्याच्या आवाजाने पक्ष्यांनी एकच कल्ला केला. यावेळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी 30-35 फूट उंचीवर अडकलेल्या झाडावर चढून अलगद कावळ्याची सुटका केली आणि कावळ्याने आकाशात भरारी घेतल्यानंतर कावळ्यांचा गलका थांबला.

तुपे म्हणाले की, पतंग उडविणे पक्ष्यांसाठी घातक आहे. पतंगासाठी वापरलेला मांजा पक्ष्यांच्या जीवावर बेतू शकतो, हे वारंवार सांगूनही त्याबाबत अद्याप गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे आता प्रशासनानेच पतंग उडविणाऱ्यावर कडक कारवाई कऱण्याची गरज आहे. पतंग तुटल्यानंतर मांजा झाडा किंवा मोबाईल टॉवर, विद्युत वाहक तारांना अडक पडतो. त्यामध्ये अशा प्रकारे कावळा, चिमणी असे पक्ष्यी अडकून त्यांचा मृत्यू होऊ शकतो. चिनी मांजाने पक्ष्याचे पंखही कापल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच रस्त्यामध्येसुद्धा झाडाला अडकलेल्या मांज्याने दुचाकीचालकांचा जीव घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत वारंवार जागरूकता करूनही पतंग उडविले जात आहेत. मात्र, आता येथून पुढे पतंग उडविणाऱ्याला नागरिकांनीच चांगली समज देण्याची गरज निर्माण झाली आहे.