शहरीकरणाच्या कोलाहलात मामाचं गाव हरवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मामाच्या गावाला जाऊ या… ही काव्यपंक्ती आता पक्त पुस्तकामध्ये वाचायला मिळते. मागिल अनेक वर्षांपासून वाढते शहरीकरण आणि आधुनिकीकरणामध्ये मागाचा गाव हरवून गेला आहे. सुखाचा वेध घेताना आम्ही गावही विसरून गेलो. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढ नये म्हणून देशभर लॉकडाऊन आहे. त्यामुळे या वर्षी तब्बल 45 दिवस नव्हे, त्याहून जास्त सुटी असूनही घरामध्येच थांबावे लागले आहे. रेल्वे, एसटी सेवा बंद आहेच, त्याशिवाय खासगी वाहनांनाही रस्त्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे सोयीसुविधा असूनही कोरोना घराबाहेर पडू देत नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

घुंगराची बैलगाडी (बैलबंडी) मागे पडली आणि झुक झुक आगिनगाडी आली आणि तिथेसुद्धा मोठा बदल झाला आता धुरांच्या रेषा बंद झाल्या, विजेवर आगिनगाडी धावू लागली. तसेच सुखाच्या जगामध्ये शहरवासियांकडे स्वतंत्र महागड्या चारचाकी आल्या, त्यातून एक दिवसाची सफर सुरू झाली आहे. त्यामुळे घुंगराच्या बैलगाडीमध्ये मामाच्या गावला जायचे दिवस कधीच संपले. त्यानंतर धुरांचे रेषा हवेत काढी, पळती झाडी पाहू या, मामाच्या गावाला जाऊ, हेही मागे पडले, नव्हे तर मामाचा गावच दूर दूर जाऊ लागला आहे. कारण मामाच शहरामध्ये स्थायिक झाला आहे.

अभ्यास, परीक्षा, शॉर्ट टर्म कोर्स, स्वीमिंग, पुढील वर्गाचे क्लासेस अशी कोणतीच कटकट यावर्षी मुलांना ऐकावी लागली नाही. उलटपक्षी घराबाहेर पडू नका, घरातच थांबा, असा आदेश दिला जात आहे. गल्लीबोळसुद्धा बॅरीगेट, काठ्या, पत्रे लावून बंद केले आहेत. गावाकडे सोडा, शेजारच्या घरामध्येसुद्धा जायची भीती वाटू लागली आहे. तब्बल 45 दिवस नव्हे अजूनही काही दिवस सुटी आहे. मात्र, पर्यटन, देवदर्शन, जंगल सफरसुद्धा बंद आहे. गावबंदी असल्यामुळे इच्छा असूनही गावाकडे जाता येत नाही, अशी अवस्था झाली आहे.

दिलीप तिऱ्हेकर यांनी सांगितले की, नोकरी-व्यवसायानिमित्त शहराकडे धाव घेतल्यानंतर तेथेच रमलेली मंडळीसुद्धा वर्षभरातून एकदा तरी गावाकडे धाव घेतात. यात्रा-जत्रा, उत्सव, लग्नसमारंभ, घरगुती कार्यक्रम अशा काही तरी निमित्ताने मराठी बाणा आपल्या माणसात रमल्याशिवाय राहत नाही, ही बाब आजही सुखावह आहे. मात्र, यावर्षी कोरोनामुळे चक्क कर्फ्यूच लागू केला आहे. लग्नसमारंभ, यात्रा-जत्रा, उत्सव असे सर्वच कार्यक्रम रद्द केले आहेत, त्यामुळे इच्छा असूनही आता कुठे जाता येत नाही, ही मोठी खंत वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

साधना विद्यालयाचे शिक्षक मंगेश धोणे यांनी सांगितले, परीक्षा संपली रे संपली की उन्हाळ्याची सुटी आणि लगेच मामाच्या गावाला जायचे वेध लागायचे. मामासुद्धा भाचेकंपनीला गावाकडे आणण्यासाठी अतूर झालेली असायची. सुटीमध्ये गावामध्ये राहायचे मस्त मजा करायची, आंबा, फणस असा गावरान मेवा खायचा, विहिरीमध्ये मस्त पोहोयचे असा काहीसा आगळावेगळा कार्यक्रम होता. मात्र, अलीकडच्या काळामध्ये मोठा बदल झाला. यांत्रिकीकरण आणि नवनवीन तंत्रज्ञान अवगत करण्याची कोण स्पर्धा वाढली. मुलांनाही क्लास, नवीन वर्गाचा अभ्यास, पालकवर्गांना सुटी मिळत नाही, अशा एका अनेक कारणामुळे गावाकडे जाणे काहीसे थांबले. शहरवासियांचेच नव्हे, तर खेड्यातही चाकोरीबद्ध जीवनपद्धती सुरू झाली आहे. त्यामुळे बदलत्या काळाबरोबर नातीसुद्धा दूर गेली की काय अशी चिंता वाटू लागली आहे.

ससाणेनगर येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाचे शिक्षक नागेश तोरस्कर म्हणाले की, कोरोनाचे बाधित आणि मृत्यूचा आकडा ऐकला की, बाहेर पडायला नको, अशी अवस्था ग्रामीण आणि शहरवासियांची झाली आहे. मनोरंजनासाठी म्हणून दूरचित्रवाणी सुरू आहे. मात्र, त्यावरही जुनेच कार्यक्रम दाखविले जात असल्याने नागरिकही त्याला कंटाळले आहेत. खासगी शाळा-महाविद्यालयांनी मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू केली आहे. त्याचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत आहे. पालकवर्गाकडूनही त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असे पालकही बाब नक्कीच जमेची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

खराडी (चंदननगर) अमृत पठारे म्हणाल्या की, मामाचा गाव मोठा अशा भल्या मोठ्या शब्दात मामाच्या गावचे कौतुक होत होते. तर मामाही भाच्यांचे कोडकौतुक करण्यासाठी अग्रेसर असायचा. उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुटीमध्ये मामाच्या गावाला जायची ओढ होती. मात्र, आता शहरीकरणामुळे ही बाब काहीशी मागे पडू लागली आहे, याचे वाईट वाटत आहे. आता शहरामध्ये काही संस्था, संघटना मामाचा गाव म्हणून छोटेखानी सहली काढून ती पोकळी भरून काढत आहेत, ही बाबसुद्धा सुखावह मानली पाहिजे.