स्वच्छता दुतांच्या आरोग्याला ‘मास्क’च्या कचऱ्याचा धोका : अमृत पठारे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सावधानता म्हणून प्रत्येकजण मास्क वापरत आहे. त्यामध्ये डिस्पोजिबल आणि कापडी अशा अनेक प्रकारचे मास्क आहेत. बहुतेकजण युज अँड थ्रो अशा प्रकारचे डिस्पोजिबल वापरत आहेत. आपल्याकडे त्यासाठी डिस्पॉल करण्याची यंत्रणा नाही, त्यामुळे वापरून झालेले मास्क कचऱ्यात टाकले जात असून, तो कचरा गोळा करणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा ठरत आहेत. स्वच्छता दूतांना मास्क, हँडग्लोज आणि इतर मुलभूत सुविधा द्यावेत, अशी मागणी शिवसेना वडगावशेरी विधानसभा समन्वयक अमृत पठारे यांनी केली आहे.

अमृत पठारे म्हणाल्या की, पुणे शहर, उपनगर आणि परिसरात हजारोंच्या संख्येने स्पोजिबल मास्क आणि हँडग्लोज वापरले जात आहेत. अनेक ठिकाणी कचरा गोळा करणाऱ्या स्वच्छता दुतांना मास्क, हँडग्लोज दिले जात नाहीत. शहराचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी भल्या पहाटे उठून रस्ता स्वच्छ करतात, कचरा वेचक घरोघरी जाऊन कचरा गोळा करतात, त्यांना ठेकेदारांनी किमान सुविधा दिल्या जातात की नाही, त्या पाहिले जात नाहीत. पालिकेचे संबंधित अधिकारी एसी चेंबरमध्ये बसून निर्णय घेत असल्यामुळे त्यांना सामान्यांच्या सुख-दुःखाची जाण असत नाहीत.

डॉक्टर, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी अनेक संस्थांकडून मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीट अशी मदत केली जात आहे. मात्र, कचरा गोळा करणारे आणि रस्ता स्वच्छ करणाऱ्या स्वच्छता दूताकडे कोणाचेही आजपर्यंत लक्ष गेलेले नाही. या कर्मचाऱ्यांना हात धुण्यासाठी सोडा पिण्यासाठी वेळेवर पाणी मिळत नाही, अशी अवस्था आहे. स्वच्छता दूतांचे आरोग्य चांगले राहिले, तर शहराचे म्हणजे तुमचे आणि आमचे आरोग्य चांगले चांगले राहील. त्यासाठी पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारांना समज देऊन चांगल्या सुविधा देण्यासाठी सूचना दिल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

अमृत पठारे म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मागिल दोन महिन्यांपासून विश्वास दिला आहे. कोरोनाशी लढा देणाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून संबोधिले आहे. हा विश्वास सार्थ करण्यासाठी आपणही कोरोना विषाणूला हटविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. महापालिकेने संबंधित अधिकाऱ्यांना सक्तीचे आदेश देऊन ठेकेदाराकडून स्वच्छता दूताना प्रमाणित केलेले मास्क, हॅनडगलोज आणि इतर साहित्य पुरवणे गरजेचे आहे.