‘चेक बाऊन्स’ प्रकरणात तृप्ती देसाईंच्या वडिलांना 60 लाखांचा दंड, सहा महिन्याची शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हात उसणे पैसे घेऊन परत देण्यास नकार देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या वडिलांना चेक बाऊन्स प्रकरणात 60 लाखांचा दंड आणि 6 महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एन.एन. पाटील यांनी ही शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्षाची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. हा खटला तब्बल 15 वर्षे चालला.
दत्तात्रय नरसिंह शिंदे (रा. गुरुकृपा बिल्डींग, गगनगिरी अवतार मठ, पुणे सातारा रोड, धनकवडी) असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नावे आहेत.

याप्रकरणी व्यावसायिक महेशकुमार अट्टल यांनी चेक बाऊन्स प्रकरणी 13 नोव्हेंबर 2003 रोजी न्यायालयात खटला दाखल केला होता. तक्रारदार यांच्या कुटुंबियांचा शिंदे यांच्यावर विश्वास होता. याच दरम्यान गगनगिरी महाराज नावाने पतसंस्था तसेच विविध ठिकाणी मठांची स्थापना करण्याचे काम शिंदे यांनी सुरु केले होते.

तक्रारदार यांनी शिंदे यांना 11 जानेवारी 2001 ते 5 सप्टेंबर 2002 या कालावधीमध्ये कर्ज काढून पैसे दिले होते. तक्रारदार यांनी पैशांची मागणी केले त्यावेळी शिंदे यांनी 14 लाख 13, 12 लाख 59 हजार 713, 13 लाख 32 हजार 500 रुपयांचे विविध तारखांचे चेक दिले. मात्र, शिंदे यांनी दिलेले चेक वटले नसल्याने तक्रारदारांनी न्यायालयात याप्रकरणी दाद मागितली. 15 वर्षे चालेल्या या खटल्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लागला. तक्रारदारांच्या वतीने अ‍ॅड. ए.जी. सुतार तर शिंदे यांच्या वतीने अ‍ॅड. बी.ए. अलूर यांनी काम पाहिले.

Visit – policenama.com