लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात फुल उत्पादकांना दिलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून फुलशेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात जात नसल्याने शेतकरी मोठय़ा अडचणीत सापडले होते. मात्र, टाळेबंदीच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात शिथिलता मिळाली असल्याने फुलांचा शेतमाल हा मुंबईच्या ठिकाणी ठरलेल्या व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी जाऊ लागला आहे. त्यामुळे किरकोळ भावात का होईना, पण फुलांचा माल हा बाजारात गेल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे.

हवेली पूर्वमध्ये फुलांची लागवड केली जाते. त्यामध्ये चाफा, मोगरा, सायली, जुई, तगर, गुलाब, जास्वंद, नेवाली अशा विविध प्रकारच्या फुलांच्या समावेश आहे. परंतु मागील दोन महिन्यांपासून करोना विषाणूच्या संकटामुळे धार्मिक स्थळे बाजारपेठा सर्व काही बंद असल्याने तयार झालेल्या फुले झाडावरच कोमेजून गेली. त्याचा अनेक बागायतदार शेतकऱ्यांना लाखोचा फटका बसला आहे.

मागील काही दिवसांपासून बाजारपेठा जरी बंद होत्या. मात्र, आता पुणे शहरालगतच्या उपनगरामध्ये फुलशेतकऱ्यांचा शेत माल हा कायमस्वरूपी व्यापारी व ग्राहक आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच माल खराब होत असल्याने फेकून द्यावा लागत होता. परंतु, आता काही प्रमाणात कमी दराने मालाची विक्री करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. सर्व बाजूने नुकसान होण्यापेक्षा जे काही हाती येईल, त्यातून किमान मशागतीचा खर्च निघेल या आशेवर आम्ही सर्व शेतकरी एकत्र येऊन फुलांचा माल जास्तीत जास्त व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवला जात आहे. पाच-दहा मंडळींच्या उपस्थितीत लग्नसोहळे होत आहेत. त्यामुळे तेथेही फुलांना मागणी वाढू लागली आहे.

फुलांचे भावाला उतरती कळा

ऐन सणासुदीच्या हंगामात फुलांच्या मालाला चांगली मागणी होती. मात्र, कोरोना व्हायरसची नजर लागली आणि लाखो रुपयांच्या उत्तपन्नावर पाणी सोडावे लागले आहे. आता सर्व काही बंद असल्याने फुलांचे भावही गडगडले आहेत. जवळपास ५० ते ६० टक्क्यांनी फुलांचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे मिळेल त्या भावात फुलांची विक्री करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

मोगरा आणि झेंडूचे उत्पादक गणेश किसन कदम आणि चंद्रकांतगेबाजी काकडे म्हणाले की, मागील दोन महिन्यांपासून फुलशेतीचे नुकसान झाले आहे. आता पूर्व हवेलीतील शेतकरी एकत्र येऊन जे कायमस्वरूपी व्यापारी ग्राहक आहेत, त्यांना माल पोहोचवत आहोत. त्यामुळे थोडय़ाफार प्रमाणात विक्री होत असल्याचे समाधान वाटत आहे, असे त्यांनी सांगितले.