पुणे सोलापूर रोडवरील अपघात : परवेजचे ‘इंजिनिअर’ होण्याचे स्वप्न भंगले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे सोलापूर रोडवर झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. परवेज आत्तार याला इंजिनिअर होऊन वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते. पण या अपघातामुळे त्याचे हे स्वप्न अपूर्ण राहिले.

परवेजचे वडिल आठवडी बाजारामध्ये काथ्या साबण विक्रीचे दुकान लावतात. त्यांच्या त्या व्यवसायावर त्यांनी परवेजला बीसीएच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन दिला. तो शेवटच्या वर्षाला होता. या वर्षी पास झाल्यावर एका चांगल्या कंपनीत कामाला लागून वडिलांचे स्वप्ने पूर्ण करायचे आहे. असे आम्हाला परवेज सांगायचा पण त्याच्या अपघाती निधनामुळे त्याचं हे स्वप्न अपूर्णच राहिले, असे परवेजच्या नातेवाईकांनी सांगितले.

या अपघातातील ८ जण यवतमधील जनविद्या विकास मंदिर या शाळेत २०१४ – १५ च्या दहावीच्या बॅचमध्ये एकत्र होते. यातील सर्व जण पहिल्या इयत्तेपासून एकमेकांचे वर्ग मित्र होते. रविवारी सकाळी ८ वाजता ते रायगड येथे वर्षाविहारासाठी गेले होते. येताना पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ते पुण्याकडून यवतकडे येत होते. त्यावेळी भरधाव वेगामुळे अथवा कारचालकाला डुलकी लागल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटून कारने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या  ट्रकला धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.  दत्ता गणेश यादव हा जे एस पी एम कॉलेज (उंड्री) येथे शिकत होता. निखिल चंद्रकांत वाबळे हा विश्वराज हॉस्पिटल येथे बाऊन्सर म्हणून काम करीत होता.  विशाल सुभाष यादव हा जे एस पी एम कॉलेज, वाघोली येथे शिकत होता. शुभम भिसे (कासुर्डी) हा उरुळी कांचन येथील कॉलेजमध्ये बी सीएस ला होत. सोनू उर्फ नूर महंन्मद दाया हा लोणी काळभोर  येथे  बी. ए. च्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. अक्षय भरत वायकर हा घरी व्यवसाय करीत असे. जुबेर अजित मुलानी हा एका ठिकाणी कामाला जात होता. परवेज अशपाक आत्तार हा पूना कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला शिकत होता. अक्षय चंद्रकांत घिगे हा हडपसर येथील आणासाहेब मगर महाविद्यालयात बी. सी. एस. च्या शेवटच्या वर्षाला होता. विशाल सुभाष यादव हा यवत येथील माजी उपसरपंच सुभाष यादव यांचा मुलगा आहे.