पीएमपी बसच्या चालक आणि वाहकाला लुटण्याचा प्रयत्न, बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चतु:श्रृंगी परिसरात भरदिवसा बस थांब्यावरील पीएमपीएमएलमध्ये शिरून चोरट्यांनी चालक आणि वाहकाला मारहाण करुन रोकड लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी कैलास रणदिवे (वय 56,रा. महात्मा फुले वसाहत, पुणे स्टेशन परिसर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणदिवे हे पीएमपीएमएलमध्ये वाहक आहेत. शुक्रवारी सायंकाळी जनवाडी ते शनिपार या मार्गावरील पीएमपी बस त्यांनी जनवाडीतील शेवटच्या थांब्यावर थांबविली होती. थांब्यावर प्रवासी नव्हते. रणदिवे सहकारी बसचालक महादेव शिंदे यांच्याबरोबर बसमध्ये गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेले दोघेजण बसमध्ये शिरले. शिवीगाळ करुन त्यांनी खिडकीवर फरशी मारली. त्यानंतर रणदिवे आणि शिंदे यांना मारहाण करण्यात आली. रणदिवे आणि शिंदे यांच्याकडील रोकड लुटण्याचा प्रयत्न दोघांनी केला. परंतु, गोंधळ झाल्याने चोरटे तेथून पसार झाले.

रणदिवे आणि शिंदे यांना मारहाण करुन रोकड लुटण्याचा प्रयत्न करणारे चोरट्यांचे वय साधारणपणे 20 ते 22 वर्ष दरम्यान आहे. रणदिवे आणि शिंदे यांनी चोरट्यांचे वर्णन पोलिसांना दिले असून चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक एम. ए. जाधव पुढील तपास करत आहेत.