पुणे : विमानतळावरून वाहतूक करणार्‍या चालकांना विशेष परवाना

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे पुणे शहरातील सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, देशभरातून लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार्‍या नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विमानतळावर प्रवासी वाहतूक करणारे मोटारचालक आणि रिक्षाचालकांना पोलिसांकडून प्रवासी वाहतुकीसाठी विशेष सवलत परवाना उपलब्ध करून दिला आहे. लोहगाव येथील विमानतळावर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे.

लोहगाव विमानतळापासून प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्यासाठी अ‍ॅप आधारित प्रवासी सेवा देणारे मोटारचालक आणि तीन आसनी रिक्षा चालकांना एक वेळेपुरता विशेष सवलत परवाना देण्याचा निर्णय पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी घेतला आहे. त्यानुसार विमानतळ पोलीस ठाण्यामार्फत संबंधित वाहनचालकांना लोहगाव विमानतळावर विशेष परवाना सवलत देण्याची व्यवस्था केली आहे.

वाहनचालकांनी लोहगाव विमानतळ येथून विशेष सवलत परवाना घेतल्यानंतर परवान्यावर प्रवासाचा मार्ग तसेच वाहन क्रमांकाची नोंद करणार आहे. अशा वाहनचालकांनी प्रवास सवलत परवान्यावर जो मार्ग दिला आहे. त्याच मार्गाने प्रवास करावा, अशी सूचना देशमुख यांनी केली आहे.