Pune : नवले ब्रिजजवळ ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे जखमी, 8 वाहनांना उडवले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – अपघात प्रवण क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवले ब्रिजजवळ उतारावर ट्रकचा ब्रेक फेल होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर त्या ट्रकने 8 वाहनांना उडवले आहे. यात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान वर्दळीच्या वेळीच अपघात झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या परिसरात एका महिन्यातील हा चौथा मोठा अपघात झाला आहे.

प्रशांत गोरे (वय 32,रा. उस्मानाबाद) आणि राजेंद्र मुरलीधर गाढवे (वय 65,रा. आंबेगाव खुर्द) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सिंहगड पोलिसांनी ट्रकचालक प्रेमराम राजाराम बिष्णोई (रा. जोधपूर, राजस्थान) याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-बंगळुरू बाहयवळण मार्गावरुन रविवार सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास माल वाहतूक ट्रक मुंबईकडे निघाला होता. नवले पुलाजवळ आल्यानंतर वाडा हॉटेलसमोर या ट्रकचा ब्रेक फेल झाला. यावेळी ट्रकने एकापाठोपाठ 8 वाहनांना धडक दिली. त्यानंतर ट्रकने पेट घेतला. अपघातात मोटारी, रिक्षाचे नुकसान झाले. रिक्षा चालक ट्रक खाली आल्याने रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका वाहन चालकाचा

देखील मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलीस, वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी तसेच अग्निशमन दलाच्या जवनांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आल्यानंतर या भागातील वाहतूक सुरळीत झाली. अपघातात जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रकला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवली. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

You might also like