Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक उद्याने सोमवार (दि.18) पासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. महापालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उपक्रम पुन्हा सुरु करण्याचे आदेश पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहे.

हे उपक्रम सुरु करताना कोरोना व्हायरस प्रतिबंधासंदर्भात राज्य सरकार आणि संबंधित विभागांनी जारी केलेल्या कोव्हिड -19 च्या गाईडलाइन्सचे पालन करणे आवश्यक असल्याचे आदेश नमूद करण्यात आले आहे. महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी (दि.16) हे आदेश दिले आहेत. महानगरपालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, केवळ प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील अस्थापनांना परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु सध्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही.

आदेशात काय म्हटले आहे ?
1. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेर राज्य शासनाच्या प्रशिक्षण संस्था, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आणि क्रीडा संघटनांच्या प्रशिक्षण संस्था, क्रीडा प्रबोधिनी, स्पोटर्स अकॅडमी व सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, विविध क्रीडा उपक्रम 18 जानेवारी पासून सुरु होतील. मात्र, क्रीडा व युवक कल्याण विभाग यांनी निर्गमित केलेल्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.

2. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील शासकीय प्रशिक्षण संस्था (उदा. यशदा) सुरु होतील. मात्र, त्यासाठी आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे.

3. वॉटर स्पोटर्स, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी (उदा. नौकाविहार) उपक्रम सुरु राहतील. त्यासाठी पर्यटन संचलनालय यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालक करणे बंधनकारक आहे.

4. मनोरंजन व करमणूक पार्क, इंडोअर एंटरटेनमेंट अॅक्टिव्हीटी यासह आणि पर्यटनस्थळे खुली करण्यात येत आहेत. त्यासाठी पर्यटन संचलनालय, महाराष्ट्र शासन यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.