Pune : हडपसर भाजीमंडईमध्ये औषध फवारणी करावी – बनकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागिल आठवड्यापासून हडपसर कोरोनाबाधितांचे हॉटस्पॉट बनत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हडपसर भाजीमंडईमध्ये खरेदीदार आणि विक्रेत्यांची सतत गर्दी असते. त्यामुळे तेथे औषध फवारणी करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते महेंद्र बनकर यांनी निवेदनाद्वारे मंडईच्या निरीक्षिका अर्चना मोहिते यांच्याकडे केली.

याप्रसंगी व्यापारी अनिल काळे, मयुर फडतरे, मंडई कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मोहिते यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने औषध फवारणी करण्याचे आश्वासन दिल्याचे बनकर यांनी सांगितले.

मोहिते म्हणाल्या की, कोरोनाचा ज्वर वाढत असून, नागरिकांनी स्वतःबरोबर इतरांच्या सुरक्षेसाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, नागरिक नियमांचे उल्लंघन करण्यातच धन्यता मानत असल्याचे दिसत आहे. कोरोनावर मात करायची असेल तर नियम पाळणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, प्रशासन तुमच्यासाठीच काम करीत आहे. मात्र, नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.