पुण्यातील ‘या’ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कंट्रोल रूमशी सलग्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – “वजनदार” कमरचाऱ्याच्या लाचेच प्रकरण वरिष्ठ निरीक्षकांना चांगलेच भोवले असून, तडकाफडकी त्यांना कंट्रोलला (पोलीस नियंत्रण कक्ष) हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे इतर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान त्या वजनदार कर्मचाऱ्यास पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. तर एसीबीच्या हाती अजून तरी तो लागलेला नसल्याचे सांगण्यात आले.

चार दिवसांपूर्वी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी विलास तोगे आणि खासगी व्यक्ती बाळासाहेब चव्हाण यांच्यावर लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.

खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केल्यानंतर त्या व्यक्तीचा डिव्हीआर परत देण्यासाठी व अटक न करण्यासाठी 50 हजार मागितले होते. तर त्यातील 38 हजार घेतले देखील. मात्र 12 हजाराची सतत मागणी केल्यानं त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण मोठ्या प्रमाणात शहर पोलीस दलात गाजले गेले. त्यात गुन्हे शाखेच्या कर्मचारी देखील समावेश असल्याच्या संशयाने दोघांचे निलंबन करण्यात आले.

आधीच वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या वजनदार कर्मचाऱ्याने वारजेत देखील “पावर” वापरून तेथील “कामा” मिळवले. त्याने आणखीनच हे प्रकरण चिघळले. त्यात त्याने बदलीसाठी एक नव्हे तर तीन मंत्र्यांच्या शिफारशी आणल्याचे देखील समोर आले. मात्र त्याचे लाच प्रकरण येथील वरिष्ठ निरीक्षकांना चांगलेच भोवले आहे. तडकाफडकी त्यांना आता पोलीस नियंत्रण कक्षात अटॅच करण्यात आले आहे. परंतु अद्याप तरी ते नियंत्रण कक्षात येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तर दुसरीकडे ते पोलीस ठाण्यात येत नसले तरी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्याचे कामे सांगत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात सावळा गोंधळ उडाला आहे.