Pune : कोरोना उपाययोजनांसाठी 10 % कपातीस स्थायी समितीकडून मान्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. असे असताना यापैकी सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एकट्या पुण्यात आहे. त्यामुळे या रुग्णांना वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात 20 टक्क्यांच्या कपातीची तरतूद करण्यात यावी, असा प्रस्ताव होता. मात्र, आता 10 टक्के कपातीस स्थायी समितीकडून मान्यता देण्यात आली आहे.

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांसाठी मास्क खरेदी करणे, क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना जेवण आणि इतर सर्व आवश्यक त्या सेवा-सुविधा पुरविणे, दवाखान्यांमध्ये विविध विद्युतविषयक कामे करणे, नवीन रुग्णालये उभारणी, पुण्यात उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयासाठी होणारा खर्च या सर्व गोष्टींच्या उपाययोजनांच्या खर्चासाठी 2021-22 या आर्थिक वर्षात तरतूदीची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

तसेच भांडवली कामांसाठी केलेल्या तरतूदीतून जायका प्रकल्प, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवणे तसेच पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये विविध स्वरूपाची कामे करण्यासाठी तसेच सिंचन पुर्नस्थापना खर्चापोटी/पुनर्वसनाची रक्कम अदा करण्यासाठी केलेल्या तरतूदी वजा जाता शिल्लक राहिलेल्या तरतूदीच्या 20 टक्के सरसकट कपात करून अंदाजे 687 कोटी रुपये इतकी रक्कम उपलब्ध होईल, असा प्रस्ताव आहे.

तसेच कोरोनाग्रस्तांसाठी उपाययोजना करण्यासाठी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, आता स्थायी समितीने 10 टक्के कपातीस मान्यता दिली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय सर्वसाधारण सभेत होणार आहे.