Pune : रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणारी कात्रज डेअरीची सिमाभिंत बांधण्यास 1 कोटी 6 लाख रुपये निधी देण्यास स्थायी समितीची मंजुरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  सातारा रस्त्याने कात्रज डेअरी येथून आंबेगाव पठार कडे जाणार्‍या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या अनेकवर्ष प्रलंबित कामाला गती मिळणार आहे. कात्रज डेअरीने रस्ता रुंदीकरणासाठी जागा देण्याची तयारी दर्शविल्यानंतर महापालिकेने रस्ता रुंदीकरणामुळे पाडावी लागणारी सीमाभिंत बांधण्यासाठी १ कोटी ६ लाख रुपये खर्च देण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

कात्रज डेअरीकडून आंबेगाव पठारकडे जाणार्‍या एकमेव रस्त्याची रुंदी कमी आहे. विशेष असे की आंबेगाव पठार आणि तेथून पुढे आंबेगाव बुद्रुककडे जाणार्‍या वाहनांची या ठिकाणी मोठी वर्दळ असल्याने या रस्त्यावर सातत्याने गर्दी होते. २०१७ ला मंजुर करण्यात आलेल्या विकास आराखड्यामध्ये हा रस्ता २४ मी. रुंद दर्शविण्यात आला आहे. या रुंदीकरणामध्ये पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या कात्रज डेअरीचा सुमारे ४ हजार ४१० चौ.मी. भाग बाधित होणार आहे. हा रस्ता व्हावा यासाठी स्थानीक नगरसेवक युवराज बेलदरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. पवार यांनी महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी आणि पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या पदाधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेउन सकारात्मक मार्ग काढल्याने रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव पुढे सरकला.

रस्ता रुंदीकरणामध्ये कात्रज डेअरीच्या ३१४ चौ.मी.च्या तीन बैठ्या इमारतींसोबतच संपुर्ण सिमाभिंत पाडावी लागणार आहे. या भिंतीचा खर्च महापालिकेने उचलण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार भिंत बांधण्यासाठी येणारा १ कोटी ६ लाख रुपये खर्च देण्यासंदर्भातील प्रस्ताव आज स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.