Pune : आंबिल ओढ्यातील सिमाभिंती बांधण्याच्या निविदांना ‘स्थायी’ची मंजुरी

पुणे – मागीलवर्षी सप्टेंबरमध्ये आलेल्या पूरामध्ये उध्वस्त झालेल्या आंबिल ओढ्यातील सिमाभिंती बांधण्याच्या तीन निविदांना आज स्थायी समितीच्या बैठकीमध्ये एकमताने मंजुरी देण्यात आली, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

मागीलवर्षी २५ सप्टेंबरला कात्रज परिसरात झालेल्या ढगफुटीच्या घटनेनंतर आंबिल ओढ्याला आलेल्या महापुरामुळे अनेकठिकाणच्या पुलांचे तसेच ओढ्याच्या सीमाभिंती पडून शेजारील सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. या पूरामध्ये जिवितहानी सोबतच मोठ्याप्रमाणावर वित्तहानीही झाली होती. यानंतर ओढ्यावरील पुल दुरूस्ती तसेच सिमाभिंतींचे कामही हाती घेण्याचा निर्णय झाला होता. पहिल्या टप्प्यात ओढ्यातील सर्व राडारोडा आणि गाळ काढून खोलीकरणाचे काम करण्यात आले आहे. तर सीमाभिंतीच्या कामाच्या तीन निविदांना स्थायी समितीने आज मान्यता दिली.

या तीन निविदांपैकी के.के. मार्केट ते पदमावती पूल व गजानन महाराज चौक ते वैकुंठाजवळ ओढा ज्याठिकाणी मुठा नदीला मिळतो तेथपर्यंतच्या कामाची ६ कोटी १८ लाख रुपयांची मे. सावी इफ्रास्ट्रक्चर्स ऍन्ड प्रॉपर्टीज प्रा. लि.ची १५.०३ टक्के कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली. याच कंपनीने पेशवे तलाव ते पदमजी पार्क व पदमावती पूल व गजानन महाराज चौक दरम्यान महापालिका मिळकतींच्या सीमाभिंती बांधण्याची १५.०३ टक्के कमी दराने भरलेली ८ कोटी ९४ लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. तर पदमजा पार्क ते के.के. मार्केट आणि कात्रज स्मशानभुमी दरम्यान महापालिकेच्या मिळकतींच्या सिमाभिंती बांधण्याची १८.५१ टक्के या सर्वात कमी दराने आलेली मे. साई सिद्धी इफ्रास्टक्चर कंपनीची एक कोटी ७७ लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली, अशी माहीती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

दरम्यान, मे. सावी इफ्रास्ट्रक्चर्स ऍन्ड प्रॉपर्टीज प्रा.लि. ही कंपनी अपात्र असताना तिला पात्र करण्यासाठी अधिकार्‍यांच्या एस्टीमेट कमिटीने जाणीवपूर्वक अटीशर्ती तयार केल्या आहेत. प्रथमच सीमाभिंतीच्या कामाचे घनफुटांऐवजी चौरस फुटांवर एस्टीमेट करण्यात आले आहे. एका भाजप पदाधिकार्‍याच्या दबावाखाली अतिरिक्त आयुक्त डॉ. शांतनु गोयल यांनी असा चुकीचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवला आहे. हा प्रस्ताव मंजूर केल्यास नगरविकास विभागाकडे तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा कॉंग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेउन दिला होता. यानंतरही स्थायी समितीमध्ये एकमताने हा प्रस्ताव मंजूर झाल्याने शिंदे काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामध्ये सिमाभिंतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेची पुनरावृत्ती होउ नये, यासाठी प्रशासनाने मान्यतेसाठी ठेवलेल्या भिंतींच्या बांधकाम प्रस्तावांना आज मंजुरी देण्यात आली आहे.

– हेमंत रासने (स्थायी समिती, अध्यक्ष)