Pune : अधिक मासानिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात वेद पठणास प्रारंभ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ढुंढिराज तथा अधिक मासानिमित्त ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या चार वेदांच्या पठणास आज (मंगळवारी) प्रारंभ करण्यात आला. आजपासून सलग पंधरा दिवस वेद पठण, नवचंडी होम, ब्रह्मणस्पती सूक्ताचे हवन, असे विविध कार्यक्रम मंदिरात होणार आहेत.

मानवजातीवरील कोरोनाचे संकट दूर व्हावे याकरिता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. गणेश कृपा होण्याकरिता माता ऋद्धी, सिद्धी यांच्याकडे संकल्प केला जाईल. दुष्ट शक्तींचा नायनाट व्हावा असे आवाहन भैरवनाथाला केले जाईल. अधिकस्य अधिक फलम् असे बळ अधिक मासात केलेल्या प्रार्थनेद्वारे मिळते. गणरायापर्यंत ही प्रार्थना अधिक पोहोचते अशा श्रद्धेने विघ्नहर्त्या गणेशासमोर यज्ञ – याग, होम – हवन करीत आहोत असे ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांनी सांगितले.

वेद पठणाला आज प्रारंभ झाला असून नऊ ऑक्टोबरपर्यंत दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळात वेदांच्या संहितांचे पठण होईल. ऋग्वेद – नारायण आराध्ये, सचिन कुलकर्णी करतील, यजुर्वेद – वेदमूर्ती सागर विरसणीकर, बाळकृष्ण गोखले, लक्ष्मीकांत जोशी आणि तुषार देवधर, सामवेद – वेदमूर्ती गणेश पुराणिक, सचिन जोशी आणि अथर्ववेद संहितांचे पठण – निलेश जोशी, निखिल पांडे करतील. दिनांक पाच ते नऊ ऑक्टोबर गणेश याग, नवचंडी पाठ आणि हवन होणार आहे. दिनांक पाच आणि सहा रोजी गणेश याग. संकष्टी चतुर्थीला दिनांक पाच रोजी गणेश यागासह विशेष अभिषेक, राजोपचार, एकविंशती आवरण पूजन आणि सहस्त्रदुर्वार्चन. दिनांक सहा रोजी गणेश याग. दिनांक सात ते नऊ नवचंडी याग. दिनांक सात रोजी सप्तशती पाठ, दिनांक आठ रोजी देवी राजोपचार पूजा, सहस्त्र कुंकुमार्चन, नवार्ण पूजन. दिनांक नऊ रोजी चंडी हवन व पूर्णाहुती होईल. मोरगांव येथील वेदमूर्ती दिलीप वाघ ब्रह्मणस्पती सूक्त पठण करणार आहेत.

याखेरीज दिनांक दोन ते चार ऑक्टोबर सुदर्शन याग, धन्वंतरी याग, उग्र नरसिंह याग वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली होतील. मुद्गल पुराणातील गणेश स्तुतीच्या स्तोत्रांचे पठण आणि हवन वेदमूर्ती मिलिंद राहुरकर यांच्या पौरोहित्याखाली होणार आहे.

मंदिरातील हे सर्व कार्यक्रम केवळ ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीतच होतील. मंदिर बंद असल्याने ट्रस्टच्या वेब साईट अॅप, फेसबुक, यू ट्युब, ट्विटर या माध्यमांद्वारे भक्तांना या कार्यक्रमात सहभागी होता येईल. भाविकांनी या ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टने केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like