Pune : पालिकेच्या हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण अंधारात, ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणेबाबत राष्ट्रवादी युवकचे निवेदन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणामुळे मनपा शाळेतील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून दूर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऑनलाईन शिक्षण उपयोगी काही सुविधा पालिकेने उपलब्ध केल्यास पालिकेच्या विध्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीचे होईल, अशी मागणी असलेले निवेदन राष्ट्रवादी युवक पुणे शहरचे सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी शिक्षण विभाग प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत आणि उप प्रशासकीय अधिकारी धनंजय परदेशी यांना दिले.

मनपा प्रशासनस्तरावर अद्याप यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याने गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षणच घ्यायचे नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गरीब विद्यार्थ्यांना मात्र स्मार्टफोनची कमतरता. साधारण 50 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, तसेच
मोबाईलला रिचार्ज करण्यासाठी पैशांची चणचण आणि नेटवर्कमध्ये अडथळे अशा कित्येक समस्यांचा सामना करावा लागतोय. यातून वर्षभरात कामगार, कष्टकरी वर्गातल्या पालकांच्या मुलांचा शाळेशी संपर्क राहिला नाही, तर त्यांच शिक्षण थांबेल अशी भीती निर्माण होऊ लागली आहे. तरी अशा विध्यार्थ्यांना काही सुविधा पालिकेने उपलब्ध केल्यास पालिकेच्या विध्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीचे होईल, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी निवेदनातुन केली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर चे सरचिटणीस गिरीश गुरनानी यांच्यासोबत यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेचे सौरभ ससाणे, रवी गाडे, संदेश कोतकर, अमोल गायकवाड उपस्थित होते.

निवेदनमधील मागणीबाबत उत्तर देताना मीनाक्षी राऊत म्हणाल्या, ‘ऑनलाईन शिक्षण काळात , विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना अडचनी जरी येत असल्या तरी सर्व विद्यार्थ्यांना कृतीपुस्तिका देण्यात आल्या आहेत.पालिकेच्या शिक्षिका स्मार्टफोन नसलेल्या विद्यार्थ्यांच्या देखील संपर्कात आहेत.परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही त्यांना ऑनलाईन सुविधा मिळणे खरोखरच आवश्यक आहे. शिक्षण विभागाला मिळणाऱ्या फंडाच्या वर्गीकरणमुळे विद्यार्थाना ऑनलाईन उपयोगी सुविधा उपलब्ध करण्यात अडचणी येत आहेत.त्या बाबत आम्ही मागणी केली आहे.’

प्रत्येक प्रभागात असलेल्या समाजमंदिरात वाय–फाय सुविधा उपलब्ध केली तर त्याचा फायदा जवळपास राहणाऱ्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो अशी मागणी देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गिरीश गुरनानी यांनी केली. हा मुद्दादेखील सर्वसाधारण सभेत नक्की मांडू असे मीनाक्षी राऊत म्हणाल्या.