Pune : शहरात 4 हजार रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा ‘स्टॉक’ ! गुरूवारी आणखी 12 हजार इंजेक्शन्स उपलब्ध होतील
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये सध्या ४ हजार रेमडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध आहेत. उद्या आणखी १२ हजार इंजेक्शन्स उपलब्ध होणार आहेत. रुग्णांना इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. शहरात कोरोना रुग्ण वाढत असताना गंभीर रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गंभीर रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टरांकडून रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा पर्याय अवलंबण्यात येत आहे.
एका रुग्णाला सहा इंजेक्शन देण्यात येतात. सुरवातीच्या काळात या इंजेक्शन्सच्या किंमत अधिक होती, तसेच केवळ रुग्णालयांनाच याचा पुरवठा करण्यात येत होता. सध्याही रुग्णालयांनाच या इंजेक्शन्सचा पुरवठा करण्यात येत असला तरी काही रुग्णालयांमध्ये स्टॉक नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनाच हे इंजेक्शन्स घेउन येण्यास सांगण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना हे इंजेक्शन मिळविण्यासाठी अनेक ठिकाणी हेलपाटे आणि मिन्नतवार्या कराव्या लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुणे केमिस्ट असोसिएशनने रेमडिसिव्हीरची एमआरपी कमी करण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केलाच त्याचवेळी ही इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी हेल्पलाईनही सुरू केली आहे. मात्र, यानंतरही वाढती गरज लक्षात घेता इंजेक्शन उपलब्धतेमध्ये अडचणी येत आहेत.
यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की रेमडिसिव्हीर इंजेक्शन्स व अन्य औषधांच्या उपलब्धतेसाठी महापालिका अन्न व औषध प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहे. सध्या शहरात ४ हजार रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा स्टॉक असून उद्या आणखी १२ हजार इंजेक्शन्स उपलब्ध होणार आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही इंजेक्शन देण्यात येत आहेत.
दरम्यान, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले, की महापालिका देखिल रेमडिसिव्हीर इंजेक्शन खरेदी करण्यासाठी निविदा राबविणार आहे. देशात रेमडिसिव्हीर उत्पादन करणार्या चार कंपन्या आहेत. त्यापैकी एका कंपनीने या इंजेक्शनचे उत्पादन बंद केले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत इंजेक्शन पुरवठा साखळीत अडथळे येत आहेत. मात्र, उर्वरीत तीनही कंपन्यांनी उत्पादन क्षमता वाढविण्यास सुरूवात केली असून येत्या काळात रेमडिसिव्हीरचा तुटवडा भासणार नाही, अशी आशा एका वरिष्ठ आरोग्य अधिकार्यांने व्यक्त केली.