Pune : पिंपरी-चिंचवडमध्ये कोटींचा साडेसहा टन रक्तचंदनाचा साठा जप्त (Photos)

पुणे/वाकड : पोलीसनामा ऑनलाइन टीम – अवैधरित्या रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून साडे सहा कोटी रुपये किंमतीच साडे सहा टन रक्तचंदनाच्या लाकडाचे ओंडके, मारुती कार, चोरीचा ट्रक जप्त केला आहे. ही कारवाई नुकतीच ताथवेड येथे करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे चार साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

निलेश विलास ढेरेंगे (वय-35 रा.मुपो. पिंपळगाव देपा, संगमनेर, जि. अहमदनगर), एम.ए. सलिम (वय-43 रा. नं. 62 जोग रोड, कारगल कॉलनी, ता. सागर, जि. शिगोमा, कर्नाटक), विनोद प्रकाश फर्नांडिस (वय-45 रा. नाईक चाळ, एमजीएम हॉस्पिटल शेजारी, कातकरवाडी, नौपाडा कळंबोली,नवी मुंबई), झाकीरहुसेन अब्दुलरेहमान शेख (वय-50 रा. एफजी 1, चिता गेट ट्रॉम्बे, मुंबई), मिन्टोभाई उर्फ निर्मलसिंग मंजितसिंग गिल (वय-36 रा. मॅकडोनल्डजवळ, कळंबोली, नवी मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीस नाईक वंदु गिरे आणि पोलिस हवालदार राजेंद्र काळे हे 12 मे रोजी गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना ताथवडे येथील व्हीजन मॉल येथे एक पांढऱ्या रंगाची मारुती 800 कार दिसली. गाडीला पुढील क्रमांकाची नंबर प्लेट नव्हती तर मागील नंबर प्लेट तुटलेली होती. तर काहीजण कारजवळ थांबले होते. त्यामुळे पोलिसांना कारचा आणि त्या व्यक्तींचा संशय आला.

पोलिसांनी कारमधील तिघांना तब्यात घेतले. तर अंधाराचा फायदा घेऊन दोघेजण फरार झाले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी आरोपी निलेश ढेरंगे याचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये रक्त चंदनाने भरलेल्या ट्रकचे फोटो शेअर केल्याचे दिसून आले.

पोलिसांनी आरोपींकडे ट्रक बाबत चौकशी केली असता त्यांनी रक्तचंदन चोरून रक्तचंदनाने भरलेला ट्रक (एमएच 40 केए 1869) निलकमल हॉटेल समोरील मोकळ्या जागेत उभा केला असल्याची माहिती दिली. पोलिसांनी ताथवडे येथील निलकमल हॉटेल येथे जाऊन पाहणी केली. त्यावेळी ट्रक आढळून आला. ट्रकची पाहणी केली असता ट्रकमध्ये पिवळसर रंगाचे स्पंज (फोम) शीट्सच्या पाठीमागे सुमारे पाच ते सहा फुटांचे गोलाकार रक्त चंदनाचे 6.420 टन वजनाचे लाकडी ओंडके आढळले. पोलिसांनी ट्रक, कार आणि रक्तचंदनाचे ओंडके असा एकूण 6 कोटी 52 लाख 45 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी निलेश, सलीम आणि विनोद यांना अटक केल्यानंतर झाकीरहुसेन आणि मिन्टोबाई यांना नवी मुंबई येथून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे चार साथिदार फरार असून त्यातील दोन जण दुबईत आहेत. त्यामुळे रक्तचंदन तस्करीचे काही अंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का, याचा तपास वाकड पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परीमंडळ 2 आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त वाकड विभाग श्रीकांत दिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे-1 संतोष पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे -2 सुनिल टोणपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, अभिजीत जाधव, पोलीस अंमलदार वंदु गिरे, राजेंद्र काळे, सुरज सुतार, कौंतेय खराडे, कल्पेश पाटील, अतिश जाधव, प्रशांत गिलबिले, बिभीषन कन्हेरकर, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, बापुसाहेब धुमाळ, तात्या शिंदे, नितीन ढोरजे, प्रमोद कदम, जावेद पठाण, बाबाजान इनामदार, सचिन नरुटे, शाम बाबा, नुतन कोंडे यांच्या पथकाने केली.