Pune : लॉकडाऊनमध्ये घरात थांबलो आणि ऑर्गेनिक भाजीपाला पिकवला – अशोक जाधव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –    मागिल वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे घराबाहेर पडता येत नाही, अशी अवस्था आहे. अनेक पुणेकर ज्येष्ठ नागरिकांसह नव्याने निवृत्त झालेल्यांनी घरामध्ये आनंद द्विगुणित करण्याची संकल्पना राबविली. त्यामध्ये काहींनी वाचनाचा, तर काहींनी टेरेस आणि बाल्कनीमध्ये फळबाग फुलविली, त्यामधून ऑर्गेनिक वांगी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, गवती चहा, आळू, भोपळ्यासह इतरही दररोजच्या वापरातील फळ आणि पालेभाज्यांची कुंड्यांमध्ये लागवड केली. त्यामुळे दररोज झाडांना पाणी देणे, पालेभाज्या तोडणे, त्याची निगा राखणे याचा आनंद मिळालच, त्याशिवाय ताजा आणि ऑर्गेनिक भाजीपाला मिळत असल्याचे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातील वरिष्ठ सहायक अशोक जाधव यांनी सांगितले.

हडपसर-ससाणेनगरमधील शिवनगरी सोसायटीमध्ये जाधव राहतात. जाधव म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाने मागिल वर्षी कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन आणि यावर्षी कडक निर्बंध जारी केले आहेत. घरात थांबा, सुरक्षित राहा, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन केले पाहिजे. त्यासाठी स्वतः नियमांचे पालन करीत इमारतीच्या टेरेसवर कुंड्यांमध्ये दररोजच्या वापरातील पालेभाज्या आणि फळभाज्या लावल्या. दररोज पाणी देणे, खुरपणे अशी कामे करण्यात छान वेळ जातो आणि ऑर्गेनिक फळे आणि पालेभाज्या मिळत असल्याचा दुहेरी आनंद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या आदेशानुसार रस्त्यावर गर्दी करू नका, पोलीस सांगतात, कोरोना विषाणू पसरतोय, दररोज रुग्ण वाढत आहेत, बेड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, व्हेंटिलेटर बेड नाही, रेमडिसिव्ह इंजेक्शन मिळत नाही, अशी भयावह स्थिती आहे. त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर पडू नका असा संदेश देत त्यांनी उपलब्ध जागेवर पालेभाज्या पिकविण्यात वेळ घालवण्यात मजा आहे, त्याचा आनंद घ्या. अगदी टेरेस नसेल, तर गॅलरीमध्ये तुळस लावा, चोवीस तास ऑक्सिजन मिळवा, असा संदेशही त्यांनी दिला आहे. हॉस्पिटलच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. ऑक्सिजनअभावी रुग्णांची तडफड होत आहे. त्यामुळे आता स्वच्छ ऑक्सिजन मिळविण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याची जोपासना केली पाहिजे.