पुण्यातील विद्यार्थ्याने ‘कोरोना’ रुग्णांच्या सेवेसाठी बनवला ‘रोबोट’ ! (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाशी लढताना डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, पालिका अधिकारी कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याच्या आणि त्यांच्या मृत्यूच्या बातम्यांनी व्यथित झालेल्या एका विद्यार्थ्याने स्वत:ची कल्पना लढवत रोबोटिक कोविड 19 वॉर बॉट (ट्रॉली) तयार केली आहे. ही रोबोट ट्रॉली महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयाला भेट देण्यात आली आहे. ‘कोरोना वॉरियर्स’ बाबत त्याने दाखविलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे.

विराज राहुल शहा (वय-15) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. विराज हा लष्कर परिसरातील दस्तूर विद्यालयामध्ये इयत्ता नववीत शिकतो. त्याला रोबोट तयार करणे, कोडींग आणि स्पेस सायन्सची आवड आहे. कोरोनाचा वाढता फैलाव आणि वाढत चालेली रुग्ण संख्या, रुग्णालयातील डॉक्टरर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी आदी कोरोना वॉरियर्स कडून अहोरात्र मेहन घेऊन रुग्णांची सेवा सुरु आहे. यातच विराजने दिलेल्या या ट्रॉलीमुळे कोरोना वॉरियर्स यांना खूप मोठा फायदा होणार आहे.

 

हॉस्पिटलमध्ये रुग्णांना जेवण, चहा, औषधे, नाष्टा आणि आवश्यक ती साहित्य देण्यासाठी रुग्णाच्या वॉर्डात जावे लागते. त्यासाठी पीपीई कीट घालावे लागते. हे कीट सहा तास काढता येत नाही. त्याचवेळी कोरोनाची लागण होण्याचा धोका ही असतो. त्यामुळे विराजने केलेल्या ट्रॉलीचा वापर केल्यास कोरोनाची लागण होण्यापासून कोरोना वॉरियर्स धोका कमी होऊ शकतो.