पुण्यातील कर्वेनगर परिसर जेष्ठ दाम्पत्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या, प्रचंड खळबळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील उच्चभ्रू परिसर असणाऱ्या अलंकार भागात जेष्ठ दाम्पत्याने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान पत्नीचा खून केल्यानंतर पतीने आत्महत्या केल्याचा दाट संशय आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अविनाश हेमंत गोरे (वय ६९) आणि वैशाली हेमंत गोरे (वय ६४, दोघेही रा. कर्वेनगर) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एक आत्महत्याची नोंद केली असून, महिलेच्या मृत्यूचा रिपोर्ट आल्यानंतर त्याची नोंद करण्यात येणार असल्याचे अलंकार पोलीसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरे कुटुंब येथील गंगा विष्णू संकूल येथे स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहत होते. त्यांना एक विवाहित मुलगी आहे. ते दोघेच येथे राहत होते. खासगी बँकेतून निवृत्त झाले होते. दोघांना गंभीर आजार होते. त्या आजाराला कंटाळले होते. घरकामासाठी दोन मोलकरीण होत्या. मोलकरीण जेवणाचा डब्बा करण्यासाठी आली असता तिला अविनाश यांनी आत्महत्या केल्याचे तर वैशाली या निपचित पडल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ ही माहिती अलंकार पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह ससून रुग्णालयात पाठविले व घराची पाहणी केली. त्यावेळी मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट आढळून आली. त्यात आजार पणाला कंटाळून आम्ही आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. मात्र वैशाली यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे दिसत आहे. त्यांचा गळा आवळला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे कारण नेमके समजू शकेल असे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. मात्र या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. अधिक तपास अलंकार पोलीस करत आहेत.