Pune : कोथरूड परिसरात विवाहीतेची आत्महत्या, चारित्र्यावर घेतला जात होता संशय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  चारित्र्यावर संशयावरून होणाऱ्याला छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोथरुड परिसरात घडली. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

स्नेहल सागर मांडेकर (वय 26) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती सागर मांडेकर याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत स्नेहल यांचे आईने कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहल व सागर यांचा 2012 मध्ये विवाह झाला होता. सागर हा गाडी चालक आहे. त्यांना एक 6 वर्षांची मुलगी देखील आहे. पण सागर हा स्नेहल यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना शिवीगाळ करत मारहाण करत असे. या त्रासाला कंटाळून स्नेहल यांनी दोन दिवसांपूर्वी राहत्या घरी पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर त्यांच्या आईने पोलिसात तक्रार दिली. तात्काळ गुन्हा दाखल करत पोलिसांनी सागर याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर. सी. काळे हे करत आहेत.