पुण्यात महाविद्यालयीन तरुणाची गळफास लावून आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात एका अकाऊंटंट तरुणीची आत्महत्येची घटना ताजी असताना कोथरूड परिसरात महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना समोर आली आहे. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नसून, त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सूर्यकांत सुभाष बामणे (वय २४, रा. शिल्पा सोसायटी, एमआयटी महाविद्याालय रस्ता, कोथरूड) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुर्यकांत कला शाखेत शिक्षण घेत होता. त्याचे वडील सातारा परिसरातील एका अभियांत्रिकी महाविद्याालयात प्राध्यापक आहेत. आई शिक्षिका आहे. बामणे कुटुंबीय कोथरूड भागात वास्तव्यास आहेत. ते राहत असलेल्या इमारतीचा पुनर्विकास करण्यात येत असल्याने गेल्या दिवसांपासून ते शिल्पा सोसायटीत भाडेतत्त्वावर फ्लॅट घेऊन राहत आहेत. आज सकाळी सातच्या सुमारास सूर्यकांतचे वडील सातारा येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी सूर्यकांत झोपेतून जागा झाला. वडील घरातून बाहेर पडल्यानंतर तो पाणी पिऊन पुन्हा झोपायला गेला.

सकाळी साडेआठच्या सुमारास सूर्यकांत झोपेतून जागा न झाल्याने त्याची आईने त्याला जागे करण्यासाठी दरवाजा वाजविला. मात्र, प्रतिसाद न दिल्याने आईने सूर्यकांतच्या मामाला घटनेची माहिती दिली. मामाने दरवाजा वाजवुनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी सूर्यकांतने पंख्याला दोरी बांधून गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव, पोलीस उपनिरीक्षक यशवंत पडवळे यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास कोथरूड पोलीस करत आहेत.