पुण्यात हॉटेलमध्येच कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   हॉटेलमध्येच कामगाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

संजय भरत सिनारे (वय ३२, रा.भारती विद्यापीठ पाठीमागील प्रवेशद्वार, वैष्णवी विहार सोसायटी, मूळ रा. कानड, राहुरी, नगर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय हे चाकण येथे नोकरीस होते. त्यावेळी ते नातेवाईकांकडे राहत होते. मात्र लॉकडाऊनपूर्वी तेथुन ते बेपत्ता झाले होते. याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी चाकण पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यात येत होता. परंतु, ते सापडत नव्हते.

दरम्यान संजय हे भारती विद्यापीठाच्या पाठीमागील बाजुस असलेल्या मोरया मिसळ हॉटेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून काम करत होते. रविवारी संध्याकाळी हॉटेल चालक घरी गेले. यानंतर संजय हॉटेलमध्ये झोपला. रविवारी सकाळी मालकाने हॉटेल उघडले. त्यावेळी संजय याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. तत्काळ याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास भारती विद्यापीठ करत आहेत.