Pune : खंडणी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं RTI कार्यकर्ता रविंद्र बर्‍हाटेचा अटकपुर्व जामीनाचा अर्ज फेटाळला

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकास 2 कोटी व जागा मागत दीड लाखाची खंडणी घेतल्याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याचा अटकपुर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. आज सकाळी यावर सुनावणी झाली. दरम्यान, आता बऱ्हाटे याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात रवींद्र बऱ्हाटे, बडतर्फ पोलीस हवालदार शैलेश जगताप, अमोल चव्हाण, पत्रकार देवेंद्र जैन व एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच बऱ्हाटे पसार झाला होता.. तर पोलिसांनी तात्काळ पत्रकार जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप व महिलेला अटक केली होती. त्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर त्यांना या गुन्ह्यात जामीन मिळाला होता. पण यानंतर बऱ्हाटे, जगताप, पत्रकार यांच्यासह इतरांवर विविध पोलीस ठाण्यात जमिनीबाबत अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र बऱ्हाटे पोलिसांना सापडत नव्हता. पोलीस गेली अनेक दिवस झाले त्यांचा शोध घेत आहेत. पण तो मिळून येत नाही.

दरम्यान, बऱ्हाटेनं मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. पण यात न्यायालयाने जामीन फेटाळला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी पुणे पोलिसांनी सरकारी वकिलामार्फत न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळावा, अशी मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर बऱ्हाटे व इतरांवर शहरात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. यात जमिनीशी निगडित गुन्हे आहेत. तर धमकावून गुन्हे दाखल केल्याचे म्हटले आहे. बऱ्हाटे यांनी फरार काळात एका ओळखीच्या व्यक्तीची स्कुटर चोरल्याबाबत देखील गुन्हा दाखल झाला आहे. अनेकदिवस सोलापूर जिल्ह्यात बऱ्हाटे असल्याचे यानंतर पोलिसांना समजले होते.