40 वर्षापासून फरार असणार्‍याला स्वारगेट पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेली 40 वर्षांपासून फरार असणाऱ्यास स्वारगेट पोलिसांनी अटक केली. 40 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यातील आरोपीस पकडल्याने न्यायालयाने देखील पोलिसांचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे सायकल भाड्याने नेल्यानंतर सायकल आणि त्याचे भाडे न दिल्याचे गुन्हा दाखल होता.

राजेंद्र धोडींबा सोनवणे (वय ६३, रा. गणेश पेठ) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत भवानी पेठेतील बापू नामदेव महांगडे यांनी १९८० मध्ये स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

बापू यांचे नाना पेठेत पिल्ले सायकल मार्ट नावाचे सायकलचे दुकान होते. त्यांच्याकडून राजेंद्र भाड्याने सायकल घेतली होती. त्यानंतर सायकल व त्याचे भाडे दिले नव्हते. यामुळे स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल होता. याप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र याला न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली होती. तेव्हापासून सोनवणे हा फरार होता. कोर्टात हजर राहत नव्हता. त्यामुळे कोर्टाने त्याच्या विरोधात अटक वॉरन्ट काढले होते.

स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी आरोपीचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. तपास पथकाकडून आरोपीचा शोध सुरू होता. पण, सतत पत्ता बदलून राहत असल्यामुळे तो सापडत नव्हता. खबऱ्यामार्फत त्याची माहिती काढण्यात येत होती. शेवटी त्याची माहिती मिळाल्यानंतर सोनवणे याला पकडले. न्यायालयाने देखील स्वारगेट पोलिसांच्या कामाचे कौतुक केले.