‘कानून के हात लंबे होते है’ ! 40 वर्षापुर्वीच्या गुन्ह्यातील फरारी पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कानून के हात लंबे होते है, असे उगीच म्हटले जात नाही. पुणेकरांना असाच एक अनुभव आला असून, स्वारगेट पोलिसांनी तब्बल 40 वर्षांपुर्वीच्या दाखल गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार प्रकरणात न्यायालयाने अटक वाँरट काढले होते.
विजय अरुण गरुड (वय 65,रा.भांबवडे, ता. भोर, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात 1980 मध्ये जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 आणि 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात खटल्याच्या सुनावणीसाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी उपस्थित राहण्याबाबत वेळोवेळी वॉरंट बजाविले होते. वॉरंट बजावल्यानंतरही गरुड सुनावणीसाठी हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांना पकडण्याच्या सूचना स्वारगेट पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार, स्वारगेट पोलीसांनी शोध घेण्यास सुरूवात केली. यावेळी तो त्याच्या मूळ गावी असल्याचे समजले. त्यानुसार, गरूड याला पकडले आहे.

पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, हवालदार अर्जुन, औटे, चिरमे यांनी त्यांचा शोध घेतला.