स्वारगेट पोलिसांकडून दरोड्याच्या गुन्ह्यातील टोळीकडून PMPML बसमधील चोरीचे गुन्हे उघड

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – दरोड्याच्या तयारीत असताना पकडलेल्या मुंबईच्या टोळीकडून शहरात पीएमपीत चोऱ्या करत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून तब्बल ११ गुन्हे उघडकीस आले आहेत कारने पुण्यात येऊन लॉजवर राहत होते. दिवसा पीएमपीत प्रवासकरून चोऱ्या करत होते, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी दिली.

किरण सुभाष मिस्त्री (वय २४, रा. दत्तनगर, ट्रॉम्बे रस्ता), सुर्यकांत सन्नप्पा गंगेरू (वय २५, रा. घाटकोपर, पश्चिम), इशरद अब्दुल रहीम बेग (वय २८, रा. मानखुर्द, मुंबई), नजीब मुजीद मोमीन (वय २०, रा. पाचपीर चौक, काळेवाडी ), मोहंमद शब्बीर दस्तगीर शेख (वय २३), रहीमतउल्ला समीरउल्ला शेख (वय २६, रा. दोघेही- रा. चित्ता कॅम्प ट्रॉम्बे, मुंबई) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. यांच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.

या आरोपींकडून चोरीचे ११ मोबाईल जप्त केले आहेत. त्यापैकी नऊ स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तर दोन बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याचे समोर आले आहे. याच्यांकडून एकूण सहा लाख ७४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्वारगेट पोलिसांनी चार दिवसांपूर्वी पुणे-सातारा रस्त्यावरील कालव्याजवळील एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना आरोपींना पकडले होते. त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर आरोपी हे पीएमपीमध्ये चोऱ्या करण्यासाठी मुंबईहून खास पुण्यात आल्याचे समोर आले. तसेच, ते कॅम्प परिसरातील एका लॉजमध्ये राहिले होते. त्या ठिकाणी राहून पुण्यात चोऱ्या काही दिवस चोऱ्या करून ऐवज जमा झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या कारमधून आरोपी मुंबईला जात होते.