Pune : कोयत्याच्या धाकाने लूटमार करणार्‍याला स्वारगेट पोलिसांकडून अटक

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोयत्याच्या धाकाने लूटमार करणारा सराईत गुन्हेगारास स्वारगेट पोलिसांनी सापळा रचून अटक केली. तो गेल्या 6 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

संदीप उर्फ संज्या भगवान शिंदे (रा. शाहू वसाहत, दत्तवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहेत.

संदीप उर्फ संज्या याच्यावर यापूर्वीचे 2 गुन्हे दाखल आहेत. दरम्यान 2014 मध्ये विनायक चंदगडकर हे बसने स्वारगेट बस स्थानकात पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास उतरले होते. त्यानंतर ते पायी चालत सदाशिव पेठ येथील घरी जात होते. यावेळी आरोपींने दुचाकीवर येऊन धारधार हत्याराचा धाक दाखवत त्यांच्याकडे असणारी 24 हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती. यासोबत अश्याच प्रकारे त्याने साथीदारांच्या मदतीने आणखी तिघांना लुटले होते. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार होता. गेली अनेक दिवस गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र तो सापडत नव्हता.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी पाहिजे आरोपींची माहिती काढण्यास सुरवात केली होती. दरम्यान कर्मचारी मनोज भोकरे व ज्ञाना बडे यांना माहिती मिळाली की आरोपी हा शाहू वसाहतीत येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरेश जायभय व त्यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली. चौकशी केली असता त्याने गुन्हे केल्याची कबुली दिली.