पुण्यातील स्वारगेट पोलिसांनी 13 वर्षाच्या रस्ता चुकलेल्या मुलाला सुखरूप मामाकडे पोहचवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात मामाकडे आलेला 13 वर्षाचा मुलगा घरापासून दूर आला आणि रस्ताच चुकला. तो फिरत-फिरत थेट स्वारगेट परिसरात आल्यानंतर तो नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांना आढळला. त्याच्याकडे चौकशी केली असता तो चुकल्याचे लक्षात आले. त्याला नाव सांगता येत होते, पण पत्ता माहीत नव्हता. पोलिसांनी त्याच्या मामाचा शोध घेतला आणि या मुलाला त्यांच्या ताब्यात दिले. मामा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आभार मानले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी आहे. 24 तास पोलीस गस्त घालत आहेत. स्वारगेट पोलीस जेधे चौकात नाकाबंदी च्या गस्तीवर होते. यावेळी त्यांना एक मुलगा गोधलल्या अवस्थेत दिसला. तो एकटाच असल्याने पोलिसांना तो गोंधळला असल्याचे लक्षात आले. यामुळे गस्तीवर महिला पोलिस उपनिरीक्षक मिरा त्र्यंबके, उपनिरीक्षक गणेश मोरे, कर्मचारी विजय माने यांनी त्याला बोलावले. तो घाबरलेला होता. त्यामुळे पोलिसांनी धीर दिला आणि विचारपूस केली. त्यावेळी त्याने ओमकार गावडे असे सांगितले. तसेच तो मुळचा चंदगड तालुक्यातील असल्याचे सांगितले. तो त्याच्या मामाकडे गेल्या तीन महिन्यापुर्वी सुट्टीत राहण्यासाठी आला आहे.

मात्र मामाचा संपर्क क्रमांक आणि परिसराचा पत्ता माहित नसल्यामुळे घाबरला होता. त्यानंतर त्र्यंबके यांनी ही माहिती वरिष्ठ निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांना दिली. त्यांनी मुलाच्या गावातील पोलिस पाटील रविंद्र गावडे यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी मुलाच्या मामाचा पुण्यातील संतोषनगर कात्रज येथील पत्ता व संपर्क क्रमांक दिला. त्यानुसार पोलिसांनी मामा सचिन यांचा शोध घेतला. त्यानंतर त्यांना स्वारगेट पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. तसेच भाच्चा ओमकार याला मामाच्या ताब्यात सुखरूप दिले. यावेळी भाचा सुखरूप मिळालेला पाहून गावडे दांम्पत्यांनी पोलिसांचे आभार मानले.