Lockdown : स्वीट होम दुकानदारांमध्ये संभ्रमावस्था, लॉकडाऊनमुळे स्वीट होम मालकांना लाखोंचा फटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ग्राहकाकडून फास्ट फूडला मागणी आहे. दुग्धजन्य पदार्थ लवकर खराब होतात. स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधींकडून जनता कर्फ्यू राबवला जात आहे. त्यामुळे स्वीटहोम सुरू राहील, याची शाश्वती नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रशासननेच वेगळी नियमावली करून दिली, तर दुग्धजन्य पदार्थ बनवता येतील. अन्नप्रक्रिया उद्योग सुरळत चालण्यासाठी प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना दिल्या पाहिजेत. व्यावसायिकांचे नुकसान होणार नाही आणि ग्राहकांनाही चांगला माल पुरवठा करता येईल. आम्ही शेतकऱ्यांकडून दूध घेतो, त्यामुळे त्यांचाही व्यवसाय सुरू राहील आणि नुकसान होणार नाही, असे हडपसमधील अग्रवाल स्वीटहोमचे मालक पवन अग्रवाल यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊननंतर काहीशी शिथीलता आणली आहे. मात्र, दुकानदारांमध्ये संभ्रमावस्था आहे. स्वीट होममध्ये दुग्धजन्य पदार्थ असतात. लॉकडाऊन केल्यामुळे पहिल्यांदाच लाखो रुपयांचा माल फेकून द्यावा लागला, आता आम्हाला ती जबाबदारी घ्यायची नाही. अगदी तोकडा माल बनवून त्या दिवशीच विकायचा असे ठरविले आहे. ग्राहकांनाही दुकाने उघडी आहेत की बंद आहे याचा अंदाज येत नसल्याने स्वीट होममध्ये खरेदी करण्यासाठी फिरकत नाही, अशी स्थिती आज आहे, असे हडपसर परिसरातील स्वीट होमच्या मालकांनी सांगितले.

स्वीट होममध्ये पेढे, बर्फी, रसमलई, गुलाबजाम, सामोसे, वडपाव, कचोरी, मोतीचूर लाडू, काजू कतली, कलाकंद, ढोकळा असे अनेक पदार्थ जास्त दिवस ठेवता येत नाहीत. डिंक लाडू बनवले आहेत, मात्र, त्याला मागणी नाही. सध्या ग्राहकांकडून या पदार्थांपेक्षा नूडल्स, मॅगीसारख्या मेनूला जास्त मागणी आहे. आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठीचा महत्त्वाचा मेनू म्हणजे पेढा आहे. मात्र, लॉकडाऊननंतर पेढ्यांना मागणी तुलनेने अत्यंत कमी झाली आहे. स्वीट होमचा डोलारा सांभाळताना नाकीनऊ आले आहे. मागिल पावणेदोन महिने दुकाने बंद होती. मात्र, कारागिरांना पगार आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था कायम ठेवावी लागली आहे. आम्ही एकही कामगार कमी केला नाही, पगार कमी केला नाही. कारण हा कारागिर अत्यंत महत्त्वाचा आहे. आता त्यांच्यावर वेळ आली आहे म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. उद्या लॉकडाऊन उठल्यानंतर हा कारागिर आपल्याकडे राहिला पाहिजे, यासाठी त्यांना सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे, असे स्वीट होमच्या मालकांनी सांगितले.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रभाव नसलेल्या क्षेत्रातील स्वीटमार्ट व फरसाणची दुकाने सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, कोणत्याही प्रतिष्ठानात बसून पदार्थ खाण्याची सुविधा दिलेली नाही. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापर करीत नियमांचे पालन करून पार्सल व्यवस्था सुरू केली आहे. त्यामुळे उपनगरातील बहुतेक स्वीट होम सुरू झाली आहे. मात्र, त्यांच्या मनामध्ये अजूनही लॉकडाऊनची भीती आहे. पार्सलची व्यवस्था असली तरी घरपोच सेवा देण्याचे अद्याप तरी नियोजन नाही, असे स्वीट होममालकांनी सांगितले.

जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे आपल्याकडे 24 मार्च रोजी 21 दिवसांचे लॉकडाऊन केले. मात्र, तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा 16 दिवसांचे लॉकडाऊन आणि 1 मे पासून पुन्हा तिसऱ्यांदा 17 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. चौथ्यांदाही लॉकडाऊन होण्याची शक्यता असल्यामुळे आता स्वीट होममध्ये किती माल बनवायचा असा प्रश्न पडला आहे. पुन्हा लॉकडाऊन झाले, तर तयार केलेल्या मालाचे काय करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. पहिल्यांदा लॉकडाऊन केल्यानंतर प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा ही तशी वेळ येऊ नये, म्हणून अगदी कमी प्रमाणात माल बनविला जातो, असे सर्वच स्वीट होममालकांनी स्पष्ट केले.

लॉकडाऊनच्या काळात पावणेदोन महिने स्वीटहोमची दुकाने बंद ठेवावी लागली. याच कालावधीमध्ये हिंदू नववर्षाची सुरवात झाली. गुडीपाडवा, रामनवमी, हनुमानजयंती, अक्षय तृतीयेला मिठाईचा चांगला व्यवसाय होतो. मात्र, या कालावधीमध्ये स्वीट मार्टची दुकने बंद राहिले. तरीसुद्धा कारागिरांनाही जेवणासह पगारही द्यावा लागला, त्यामुळे ल्याने व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, व्यवसाय सुरू होत असल्याने दिलासा मिळाला आहे, अशी भावनाही त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.