Pune : हडपसरमधील ग्लायडिंग सेंटरमध्ये कचरा टाकणाऱ्यावर कारवाई करा- अभ्यासकांची मागणी

पुणे : हडपसर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह युवावर्ग भल्या सकाळी आणि सायंकाळी ग्लायडिंग सेंटरमध्ये वॉकिंगसाठी येतो. तुकाई दर्शन ते काळे-बोराटेनगर दरम्यान 8 फुटी सीमाभिंतीवरून तुकाईदर्शन, काळे-बोराटेनगर, ढमाळवाडी, पापडेवस्ती परिसरातील नागरिक रात्री-अपरात्री पहाटेच्या वेळेस भिंतवरून कचऱ्याच्या पिशव्या ग्लायडिंग सेंटरमध्ये भिरकावून देतात. एखाद्याने विचारणा केलीच, तर माझ्या एकट्याच्या कचर्याने काय होणार? असे सांगत निघून जातात. सीमाभिंतीलगत आतिल मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. कचरा सुकला किंवा वाळल्यानंतर येथील कर्मचारी तो पेटवून देतात. त्यामुळे परिसरात धुराच्या लोटामुळे हवा प्रदूषित होते आणि ज्येष्ठ नागरिक-लहान मुलांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. कचरा टाकणाऱ्यावर कोणीच बंधन आणले नाही, तर ग्लायडिंग सेंटर कचराकुंडी होईल, अशी भीती येथील अभ्यासकांनी व्यक्त केली.

हडपसरवासियांना सासवड रस्त्यालगत असलेले ग्लायडिंग सेंटरचे भले मोठे मोकळे मैदान देणगीच मिळाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ऑक्सिजन (प्राणवायू) मिळत नसल्याने आज अनेक रुग्णांची तडफड होत आहे. मात्र, सहजात मिळालेल्या कुठल्याही वस्तूची किमत कळत नाही, असे म्हणतात, ते खरे आहे. ग्लायडिंग सेंटरच्या सीमाभिंतीलगत कचरा टाकणे हा आमचा जन्मसिद्ध हक्कच आहे, असे समजून अनेक नागरिक कचरा टाकतात. एवढेच नाही, तर अनेक मंडळी घरातील कचरा प्लास्टिकच्या पिशवीत कचरा भरून कामावर जाताना ग्लायडिंग सेंटरमध्ये भिरकावून देतात.

सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ होले म्हणाले की, ग्लायडिंग सेंटरमधील कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे रोगराई पसरून आसपासच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याशिवाय राहणार नाही. ग्लायडिंग सेंटरच्या प्रशासनाने तातडीने कचरा टाकणाऱ्यावर कारवाई करावी, तसेच कचरा स्वच्छ करून तेथे औषध फवारणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. महानगरपालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांनी सासवड रस्ता, ससाणेनगर रस्ता, तुकाईदर्शन-काळे- बोराटेनगरच्या बाजूला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली पाहिजे. तसेच कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी सीमाभिंतीवर लोखंडी जाळी बसविण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, विक्रम आल्हाट यांनी सांगितले की, ग्लायडिंग सेंटर हडपसरवासियांना भल्या सकाळी-सायंकाळी वॉकिंगसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी हडपसर आणि परिसरातील नागरिकांना एकमेव ठिकाण राहिले आहे. इतरत्र सर्वत्र बांधकामे झाल्याने जीव गुदमरून जात आहे. मात्र, ग्लायडिंग सेंटरलगतची मंडळी कचरा टाकत असल्याने भविष्यात कचराकुंडी होणार की काय असा प्रश्न पडत आहे. तसेच हौशी मंडळी कुत्र्यांना येथे विधी करण्यासाठी आणतात, ही बाब गंभीर आहे. काही मंडळी वाहने आतमध्ये घेऊन येतात. या ठिकाणी अ‍ॅकॅडमीचे विद्यार्थी व्यायाम करतात, रनिंगचा सराव करतात, त्यांना त्याचा अडथळा होतो याचे तरी किमान त्यांनी भान ठेवणे गरजेचे आहे. मात्र, या मंडळींना समजावून सांगणार तरी कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.