Pune : पैसे घ्या पण लस द्या ! पुणेकरांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पहिल्या लाटेतून देश सावरत होता तोच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आणि सर्व जनजीवन विस्कळीत झाले. कोरोनावर मात करण्यासाठी सर्व जगभरात लसीकरण करणे सुरू झाले असून काही देशातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण देखील झाले असून त्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असून पुणे शहरात विधारक परिस्थिती असताना नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याकडे लक्ष देणे गरजेचे असताना केंद्र व राज्य सरकारच्या राजकारणात नागरिकांचे जीव धोक्यात आल्यामुळे पुणेकरांना पैसे घ्या पण लस द्या म्हणायची वेळ आली असल्याचे पुणे महानगरपालिकेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल म्हणाले.

बागूल म्हणाले की, पुणे शहरात कोरोनाची दुसरी लाट आली असून अनेक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शहरात आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून नागरिकांना ऑक्सिजन बेड,व्हेंटिलेटर बेड व रेमडीसीवीर औषधांसाठी वणवण करावी लागत आहे. ही खेदाची बाब आहे. त्यातच केंद्र सरकारकडून तिसऱ्या लाटेची शक्यता सांगण्यात आली आहे. नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी शहरात लसीकरण मोहीम जलदगतीने राबविणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टीने पावले उचलली गेली पाहिजेत नाहीतर देशात व शहरात मृत्यूचे तांडव होईल.

केंद्र व राज्य सरकारच्या श्रेय लढाईत सर्व राज्यांच्या नागरिकांना वेठीस धरण्यात येत आहे. लसीकरण जलदगतीने करण्यासाठी देशाबाहेरून आयात करा किंवा पुणे, हैद्राबाद यापैकी कोणतीही लस नागरिकांना द्या परंतु लवकरात लवकर निर्णय घेऊन लस द्या. केंद्र व राज्य सरकारवर लसीकरणाचा अतिरिक्त बोजा पडत असेल तर नागरिक पैसे देऊन लस घेण्यास तयार आहेत. परंतु त्यांना लस उपलब्ध करून द्या. अशी मागणी आबा बागुल यांनी केली.

देशात करोडो रुपये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी खर्च होत आहेत. तरीही देशात मृत्यचे प्रमाण वाढत आहे. हे रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय असल्याचे नागरिकांना वाटत आहे.लसीकरण पूर्ण केल्यानेच देशातील कोरोना दूर होईल. जीवन वाचले, तरच देश वाचेल,देश वाचला तरच राजकारण व राजकारणी वाचतील अशी म्हणायची वेळ आता आली असून आपापसातील मतभेद दूर देऊन देशातील,राज्यातील व शहरातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम जलदगतीने राबवावी अन्यथा नागरिक पैसे देऊन लसीकरण करण्यास तयार असून त्यांना लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेवटी आबा बागुल यांनी केली.