गॅस गिझरच्या वायूमुळे पुण्यातील शिक्षकाचा गुदमरून मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बाथरुमध्ये लावण्यात आलेल्या गॅस गिझरच्या वायूमुळे गुदमरून एका खासगी शिकवणीचे वर्ग घेणाऱ्या शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गॅस गिझरमधून गॅस बाहेर पडल्याने या शिक्षकाचा गुदमरुन मृत्यू झाला. ही घटना कोथरुडमधील संगम सोसायटीमध्ये मंगळवारी (दि. 4) उघडकीस आली. रामराजे किशोर संकपाळ (वय – 30) असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने घराचा आणि बाथरुमचा दरवाजा तोडून रामराजे संकपाळ याचा मृतदेह बाहेर काढला. कोथरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामराजे हे कोथरुड परिसरातील संगम सोसायटीत विद्यार्थ्यांची घरामध्ये शिकवणी घेतात. त्यांचे आई – वडील बाहेरगावी रहात असल्याने ते घरामध्ये एकटेच राहतात. मंगळवारी सकाळी त्यांच्या बंद घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता घराचा दरवाजा आतून बंद होता.

पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण करून घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी बाथरुमचा दरवाजा तोडून रामराजे यांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. अंघोळ करताना गॅस गिझरमधून गॅस गळती झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.