पदवीधर व शिक्षक मतदार संघात नाव नोंदणीचे आवाहन !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी यापूर्वी अस्तित्वात असलेली मतदार यादी रद्द करण्यात आलेली असून ही मतदार यादी नव्याने तयार करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी पात्र मतदारांनी 6 नोव्हेंबर 2019 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन पुणे उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख यांनी केले आहे.

पदवीधर मतदार संघ 
1 नोव्हेंबर 2016 पूर्वी पदवी प्राप्त व्यक्ती पुणे शहरामध्ये सर्वसाधारण रहिवास असल्यास त्याबाबतचा पुरावा जोडून नमुना 18 मध्ये अर्ज तहसिल किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर करावयाचा आहे.

शिक्षक मतदार संघ
दिनांक 1 नोव्हेंबर 2013 ते 1 नोव्हेंबर 2019 या कालावधीत 3 किंवा 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्ती आणि पुणे शहरामध्ये सर्वसाधारण रहिवास असल्यास त्याबाबतचा पुरावा जोडून नमुना 19 मध्ये अर्ज तहसिल किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर करावयाचा आहे.

या पात्रता पूर्ण करणा-या सर्व व्यक्तींनी त्यांच्याशी संबंधित (पदवीधर अथवा शिक्षक अथवा दोन्ही) मतदार संघासाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. शिक्षक मतदार म्हणून पात्र मतदारांचे अर्ज संबंधित संस्थेच्या अथवा आस्थापनेच्या लेटर हेडवर आणि संबंधित व्यक्ती आपल्या आस्थापनेवर मागील सहा वर्षात तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी शिक्षक म्हणून कार्यरत असल्यास परिशिष्ठ-2 मधील प्रमाणपत्र सादर करून अशा सर्व व्यक्तींचे नमूना 19 मधील अर्ज यादीसह उपविभागीय अधिकारी पुणे तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पुणे या कार्यालयास सादर करावेत.

पात्र मतदारांनी अर्जासोबत दिनांक 1 नोव्हेंबर 2016 पूर्वी ची पदवी प्रमाणपत्र अथवा पदवीच्या अंतिम वर्षाची गुणपत्रिका (मार्कशीट) सादर करावी. अर्जावर त्यांचे छायाचित्र लावलेले असणे आवश्यक आहे. तसेच संबंधितांनी त्यांचे EPIC क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. तसेच उपरोक्त दोन्ही वर्गवारी मध्ये पात्र ठरणारे शिक्षक हे पदवीधर तसेच शिक्षक अशा दोन्ही मतदार संघासाठी अनुक्रमे नमुना 18 आणि नमुना 19 मध्ये अर्ज सादर करू शकतील.

पुणे उपविभागीय अधिकारी कार्यालयाद्वारे या कामासाठी नोडल अधिकारी म्हणून श्री राजकुमार गभाले, नायब तहसिलदार व श्री संजय ढमाले, अव्वल कारकून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबतीत कोणतीही शंका किंवा अडचण निर्माण झाल्यास कार्यालयाच्या ई-मेल [email protected] अथवा 020-26060472 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. उपरोक्त बाबीसाठी शैक्षणिक व सामाजिक संस्था, बँका, सरकारी व खाजगी कार्यालय प्रमुखांच्या मार्फत एकत्रित अर्ज सादर करु शकतील. अन्य पात्र मतदारांनी त्यांचे अर्ज वैयक्तिक रित्या सादर करणे बंधनकारक आहे. यासाठी नमुना 18 व 19 चे अर्ज आवश्यक असल्यास देखील पुणे उपविभागीय कार्यालयास संपर्क साधावा, असेही पुणे उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Visit : policenama.com